विनाटेस्ट प्रवेशाच्या अखेरच्या दिवशी झुंबड
प्रतिनिधी/ खेड
गणेशोत्सवासाठी कोकणात विना चाचणी एन्ट्री मिळवण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी कशेडी चेकपोस्टवर वाहनांची मोठी गर्दी उसळली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने चाकरमान्यांची काही काळ रखडपट्टी झाली. दरम्यान, गेल्या 10 दिवसांत जिल्हय़ात सुमारे 46 हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन प्रक्रियेमुळे यंदा गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. गुरूवारपासून येणाऱया चाकरमान्यांना कोरोना टेस्ट निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे यासारख्या शहरातून गावाकडे येणाऱया चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. गणरायाच्या आगमनापूर्वी तीन ते चार दिवस आधी गाव गाठणाऱया चाकरमान्यांवर यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे मार्गात अनंत अडथळे निर्माण झाले आहे. सरकारच्या नियमांचे पालन करूनच चाकरमान्यांना गाव गाठावे लागत आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना 10 दिवस क्वारंटाईनची सक्ती असल्याने हा कालावधी पूर्ण करण्यासाठी बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत गावात पोहचणे आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱया चाकरमान्यांना कोरोना अहवाल निगेटीव्ह असल्याचे सर्टीफिकेट असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही. बुधवारपर्यंतच विनाटेस्ट प्रवास करता येणार असल्याने अखेरच्या दिवशी कशेडी चेकपोस्टवर वाहनांची मोठी गर्दी उसळली होती.
कोरोनाच्या सावटामुळेच यावर्षी गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले असून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱया चाकरमान्यांच्या संख्येतही कमालीची घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या सायंकाळर्पंत जिल्हय़ात 46 हजार 464 चाकरमानी दाखल झाल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. क्वारंटाईन कालावधी, रेल्वे गाडय़ांची घोषणा व घुमजाव, एसटी बसेस सोडण्याचा उशीराने घेतलेला निर्णय अशा अनेक कारणांनी चाकरमान्यांनी गावी न येता आहे तेथेच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
पोलीसांचा मोठा बंदोबस्त
विनाचाचणी कोकण प्रवेशाच्या अखेरच्यादिवशी महामार्गावर वाहनांची गर्दी उसळण्याच्या शक्यतेने कशेडी चेकपोस्टवर बुधवारी जादा पोलिसांची कुमक व राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले. गणेशोत्सवासाठी गावी येणाऱया चाकरमान्यांची अखेरच्या दिवशी मात्र सकाळपासूनच कशेडी चेकपोस्टवर एकच गर्दी उसळल्याने पोलीस यंत्रणेला चांगलाच घाम फुटला. कशेडी चेकपोस्टवर प्रत्येक वाहनांची करण्यात येणाऱया कडक तपासणीच्या प्रक्रियेमुळे गणेशभक्तांना तासन्तास रखडपट्टीला सामोरे जावे लागले. वाहनांच्या लांबच लांब रांगामुळे वाहतूककोंडी फोडताना पोलिसांची दमछाक झाली.
खेड तालुक्यात साडेपाच हजार चाकरमान्यांचे आगमन
मुंबईसारख्या शहरातून 230 वाहनांद्वारे 1050 चाकरमानी तालुक्यात डेरेदाखल झाले आहे. पुणे येथून 213 वाहने तालुक्यात दाखल झाली असून याद्वारे 852 चाकरमानी गावी आले आहे. इतर जिल्हय़ातून सर्वाधिक 905 वाहनांद्वारे 3785 चाकरमान्यांनी गाव गाठले आहे. 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत 1348 वाहनांतून 5687 चाकरमानी तालुक्यात दाखल झाले आहेत. गणेशभक्तांच्या सोयीसाठी सरकारने जादा बसेस सोडल्या असल्यातरी चाकरमान्यांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे.
गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खड्डय़ातूनच!
गावी येणाऱया गणेशभक्तांवर यंदाही खड्डय़ातूनच प्रवास करत गाव गाठण्याची नामुष्की आली आहे. महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे मनस्तापाबरोबरच विलंबाचा प्रवासदेखील पदरी पडत आहे. महामार्गावरील खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी प्रशासनाला अजूनही सवडच न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.









