प्रतिनिधी / सिंधुदुर्ग
आवानओल प्रतिष्ठानतर्फे 18 जानेवारी रोजी कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या दशकपूर्ती कविवर्य वसंत सावंत स्मृती उगवाई काव्योत्सवाच्या अध्यक्षपदी मराठीतील नामवंत कवयित्री,भाषांतरकार, समीक्षक प्रा.डॉ शोभा नाईक (बेळगाव) यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार 18 जानेवारीला सायं.5.30 वा.कणकवली हॉटेल गोकुळधामच्या युनिक अकॅडमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
कोकणातील प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या कवींना हक्काचा मंच मिळावा यासाठी कविवर्य वसंत सावंत यांनी तळकोकणात कवितेची चळवळ त्याकाळी सुरू केली. त्यांच्या स्मृती जपल्या जाव्यात आणि नव्या जाणिवांच्या कवींची कविता चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी आवाओल प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी उगवाई काव्योत्सवाच्या आयोजित करण्यात येतो.या काव्योत्सवाचा दशकपुर्ती सोहळा यावर्षी प्रा.डॉ. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होत असून डॉ. नाईक यांची मराठी भाषेच्या एक नामवंत अभ्यासक अशी ओळख आहे.
सध्या त्या बेळगांव आरपीडी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मराठी-कन्नड संस्कृतीच्या शोध घेणाऱ्या अभ्यासाक म्हणूनही त्यांचा परिचय असून कर्नाटक राज्य शासनाच्या मराठी अकरावी-बारावी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध असून त्यांना धारवाड विद्यापीठातर्फे विंदा करंदीकर काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य वाड.मय पुरस्काराने त्यांना तीन वेळा गौरविण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत.
या वर्षीच्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात जुन्नर पुणे येथील कवी अनिल साबळे यांना त्यांच्या ‘ टाहोरा’ या काव्यसंग्रहासाठी कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार तर वैभववाडी येथील कवी नामदेव गवळी यांना त्यांच्या ‘भातालय’ काव्यसंग्रहासाठी कविवर्य द. भा.धामणस्कर काव्य पुरस्कार प्रा.डॉ. नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात डोंबिवली येथील प्रसिद्ध कवी नारायण लाळे यांच्या अध्यक्षतेखाली खुले कविसंमेलन होणार असून यात नव्या जुन्या कवींच्या कविता सादर होणार आहेत.दरम्यान या कार्यक्रमात सिंधुदुर्ग विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर -सावंतवाडी,कवी सफरअली इसफ – वैभववाडी, कवयित्री कल्पना मलये-कणकवली यांचाही गौरव करण्यात येणार आहे.उगवाई काव्योत्सवात कविता वाचण्यासाठी कवीनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी 9404395155 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.