वार्ताहर / मडकई
गाळशीरे-कवळे येथील सदाशिव अभिषेकी व बाबनी गावडे यांच्या घरावर वृक्ष कोसळून अंदाजे रु. 30 हजारांची नुकसानी झाली. रविवारी उशिरा रात्री जोरदार कोसळणाऱया पावसाच्यावेळी ही घटना घडली.
दोन्ही घरांच्या छप्पराची मोडतोड झाली असून काही ठिकाणी भिंतींनाही तडे गेले आहेत. पावसाचे पाणी घरात शिरल्याने आंतमधील सामानही भिजून खराब झाले. सरपंच राजेश कवळेकर व स्थानिक पंच उषा नाईक यांनी तलाठय़ाच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करुन नुकसानीचा आढावा घेतला. फोंडा अग्नीशामक दलाच्या जवानांनी घरावरील वृक्ष हटविण्यास मदत केली. स्थानिक आमदार सुदिन ढवळीकर यांनी नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान या दोन्ही घरांच्या बाजूला असलेले जुनाट व धोकादायक आंब्याचे झाड कापून टाकण्याची नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. त्यासंबंधी उपजिल्हाधिकारी कार्यालयातही अर्ज करण्यात आला आहे. शांतादुर्गा देवस्थानच्या जागेत हा धोकादायक वृक्ष असून देवस्थान समितीकडून ना हरकत दाखला मिळत नसल्याने पंचायतीला हे झाड कापता येत नाही अशी माहिती सरपंच राजेश कवळेकर यांनी दिली.