वार्ताहर / मडकई :
कवळे ग्रामपंचायत क्षेत्रातील ओल्या कचऱयाच्या निर्मूलनार्थ मिनी प्रकल्पाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू होते. शांतादुर्गा देवस्थानचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी काही अडचणी उपस्थित झाल्या होत्या. त्यामुळे कचऱयाची विल्हेवाट लावताना काही मोजक्याच प्रभागातील कचरा गोळा करावा लागला, असे स्पष्टीकरण कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी पंचायत अवघ्याच प्रभागातला कचरा गोळा करत असल्याच्या आरोपाला ग्रामसभेतून उत्तर देताना सांगितले.
कवळे पंचायतीच्या ग्रामसभेत पंचायतीने राहीलेल्या इतर वॉर्डातील कचरा गोळा केला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र त्यासंबधीने पंचायतीने कुठलेच पाऊल उचले नसल्याच्या आरोपाला उत्तर देताना सरपंच श्री. कवळेकर बोलत होते. कचऱयाचा ढिग वाढत असल्यामुळे तो काही मोजक्याच वॉर्डमधून गोळा केला जातो. त्यातील सुकाच कचरा वेर्णाच्या प्रकल्पात स्वीकारला जातो. हा सुकाकचरा पंचायत क्षेत्रातून उचलण्यासाठी गाडीसाठी लागणारे इंधन व बॅग्मस माधवराव ढवळीकर ट्रस्टमधून पुरविले जाते. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांचे बहुमूल्य असे सहकार्य लाभत आहे. ओला कचरा तसाच पडून राहतो. या कचऱयाचे निर्मूलन करण्यासाठी मिनी प्रकल्प पंचायत क्षेत्रात शांतादुर्गा देवस्थानचा ना हरकत दाखला घेऊन लवकरच उभारावा असा ठराव यावेळी घेण्यात आला.
कवळे पंचायत क्षेत्रातील सर्व घरांचे पुन्हा सर्वेक्षण करून त्यांच्याकडून पंचायत कायद्यानुसार घरपटी वसूल करून घ्यावी. तसेच ज्या खोल्या भाडेपटीवर दिलेल्या आहेत. त्यांचे एका महिन्याचे भाडे कराच्या स्वरूपातून पंचायतीने जमा करून घ्यावे. घर मालक भाडय़ाचा हा कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्यास पंचायत कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करावी असाही ठराव सर्वांनुमते मांडण्यात आला. पंचायत क्षेत्रात असलेल्या दुकानाचा 2 लाख 50 हजारांचा कर पंचायतीने गोळा केला असल्याची माहिती यावेळी सरपंच राजेश कवळेकर यांनी ग्रामस्थानी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
ढवळी येथील बगल रस्त्यावरील बेकायदा गाडे व शांतादुर्गा देवस्थान जवळच्या रस्त्यावर असलेल्या बेकायदा गाडय़ामुळे वाहतुकीस अडथळा उत्पन्न होत आहे. त्यासाठी जे बेकायदा गाडे असेल त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी. असाही ठराव घेण्यात आला. ढवळी येथे असलेला बेकायदा भंगार अड्डयावर विषयी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरपंच श्री. कवळेकर यांनी सांगितले, पंचायत संचालकाकडे या भंगार अडय़ासंबंधीचा खटला चालू आहे. निर्णय पंचायतीच्या बाजूने लागताच त्यावर कारवाई केली जाईल. कवळे पंचायतीच्या 1 कोटी 71 लाख रूपयांच्या अंदाज पत्रकाला या ग्रामसभेतून मंजूरी मिळवण्यात आली.
कवळे पंचायत क्षेत्रातील शेती पडीक राहू नये म्हणून उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या प्रयत्नाना तोड नाही. 1 लाख चौरस मिटरची शेती माधवराव ढवळीकर ट्रस्ट मधून त्यांनी वसवली आहे. अंदाजे 25 शेतकऱयांनी या शेतीचा लाभ घेतलेला आहे. त्यामूळे या ग्रामसभेतून आमदार सुदिन ढवळीकर यांचे सरपंच राजेश कवळेकर व ग्रामस्थांनी त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडून सर्वानुमते संमत केला. स्वागत राजेश कवळेकर यांनी केले. अहवाल सचिव हरिश्चंद्र नाईक यांनी तर आभार मनुजा नाईक यांनी व्यक्त केले.