सोलापूर / प्रतिनिधी
उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावाजवळ सुरू असलेल्या बाह्य वळण रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री 1.30 च्या दरम्यान कारचा अपघात झाला. या भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. कर्नाटकातील चार तरुण फिरण्यासाठी पुणेकडे निघाले होते. रस्त्याच्या पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने कार पुलाच्या कामाला जोरात धडकली. अपघात इतका भीषण होता की कारचे दरवाजे आणि काचा पहारीने फोडून पोलिसांनी जखमी तरुणांना बाहेर काढले. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एकाचा प्राण वाचविण्यात त्यांना यश आले.
अरुणकुमार लक्ष्मण यकंची (वय 21, रा. यरगल केटी, ता. सिंदगी, कर्नाटक), महिबूब महमद अली मुल्ला (वय 18, रा. यरगल बीके, सिंदगी, जि. विजयपूर), फिरोज सैपनसाब शेख (रा. गवसावळगी, ता. सिंदगी, जि. विजयपूर) व मुन्ना केंभावे (गवसावळगी, ता. सिंदगी, जि. विजयपूर) अशी मृत झालेल्या तरुणांची तर पैगंबर नजीर मुल्ला (रा. गवसावळगी, ता. सिंदगी, जि. विजयपूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री हे सर्व तरुण कारमधून (केए 32-2484) पुणेकडे गावातून जाण्यासाठी निघाले होते. सिंदगी येथून विजापूर-सोलापूर महामार्गावरून ते जात होते. दरम्यान, हत्तूरजवळ आल्यानंतर त्यांनी बायपास रस्त्यावरून जाणे पसंद केले. डोणगाव पास करून त्यांचे वाहन कवठेगावाजवळ रात्री 1.30 च्या सुमारास पोहोचले. तेथील काळ्या पाण्याच्या ओढय़ाच्या पलीकडे रस्त्याच्या पुलाचे काम सुरू आहे. रात्री दीडच्या सुमारास रस्त्याचा अंदाज आला नसल्याने तरुण चालवित असलेली कार पुलाच्या कामाला जाऊन जोरात धडकली.
दरम्यान रात्रगस्तीवर असलेले सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन यांना अपघाताची माहिती मिळाली. तातडीने त्यांनी पोलीस ठाण्याकडील स्टाफ घटनास्थळी मागवून घेत, अपघातग्रस्त कारचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उघडले जात नसल्याने लोखंडी पहारीने दरवाजे तोडून व काचा फोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका बोलावून घेत, जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच चौघे मृत पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, तर एका जखमीवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती पोलिसांनी तरुणांच्या नातेवाईकांना रात्री दिली. बुधवारी सकाळी मृत तरुणांच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती. महाविद्यालयीन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. महिबूब मुल्ला हा आईच्या मदतीने कॅन्टीनचा व्यवसाय करून शास्त्रशाखेत शिक्षण घेत होता. वडिलांचे छत्र हरपल्याने तो आणि आई असे दोघेच गावात राहण्यास होते. मुलाच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबातील लोकांनी सिव्हिलमध्ये हंबरडा फोडला होता. अनेकवेळा फिरायला म्हणून ही मुले विजयपूर याठिकाणी जात होती. मंगळवारीही ते तिकडेच गेले असावेत असा अंदाज तरुणांच्या घरातील लोकांनी बांधला होता. तयारीविनाच हे तरुण फिरायला निघाले कसे याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, पुलाच्या ठिकाणी खबरदारी म्हणून कोणतीच उपाययोजना दिसून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.









