दोघांना अटक : तासगाव पोलिसांकडून 24 तासात छडा
प्रतिनिधी/तासगाव
कवठेएकंद (ता. तासगाव) 36 लाख 40 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणाचा तपास तासगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात लावला आहे. फसवणूक करणाऱया दोघा व्यापाऱयांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पंकज पवार यांनी दिली. यासाठी तब्बल 1 हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या चोवीस तासात केल्याचेही त्यांनी सांगितले.
कवठेएकंद येथील शिवानी ट्रेडर्स या खाद्यतेल दुकानाचे मालक कैलास विश्वनाथ देशमाने यांनी याबाबत तक्रार दिली होती. प्रशांत दादासो पवार (रा. साईदीप एंटरप्रायजेस, कात्रज, पुणे) व अंबिका ऑईल इंडस्ट्रिजचे अजय आसाराम शेजुल (रा.प्लॅट नंबर 03 एमआयडीसी ता.राहुरी जि.अहमदनगर) यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रशांत पवार हा तेल व्यवसायातील दलाल असून एक वर्षापासून देशामाने यांच्या संपर्कात होता. देशमाने त्याच्यामार्फात खाद्यतेलाची खरेदी करत आहेत. 27 एप्रिल रोजी त्यांनी प्रशांत पवारकडे मार्केट रेट विचारला असता श्री अंबिका ऑईल इंडस्ट्रिज राहुरी या तेल कंपनीचे सोयाबीन तेलाचा भाव 1390 रूपये प्रति 10 किलो असल्याचे सांगितले.त्यामुळे देशमाने यांनी 25 टन सोयाबीन तेलाची पवार याला लगेच ऑर्डर दिली. तसेच पवार याच्या सुचनेनुसार पेमेंट अजय शेजुल यांच्या अंबिका ऑईल इंडस्ट्रिजचे नावे त्यांच्या आयसीआयसी बँकेच्या खात्यावर 36 लाख 40 हजार रूपयांचा आरटीजीएस केला. रक्कम पाठविल्याचे पवारला फोनवरून सांगून पेमेंट केल्याचा युटीआर नंबर दिला.तेल भरण्यासाठी सागर बल्क करिअर ट्रान्सपोर्टचा टँकर (गाडी नंबर एम एच-04 जीसी 4474) ही मिलवर पाठवून दिले असल्याचे सांगितले.
दुपारी दोनच्या सुमारास ड्रायव्हरने गाडी अजून भरण्यास घेतली नसल्याचे सांगितल्याने देशमाने यांनी पवारला त्याबाबत विचारणा केली. पण पवारने सायंकाळपर्यंत गाडी भरेल, असे सांगितले. पण संध्याकाळी ड्रायव्हरने फोन करून अजून गाडी भरावयास घेतली नाही असे सांगितल्याने देशमाने यांनी पुन्हा पवारला फोन केला. पवारने बँकेत कोरोना पेशंट मिळून आल्याने पेमेंट पुढे मिळाले नाही. उद्या पेमेंट मिळाल्यानंतर गाडी भरून पाठवितो असे सांगितले.
29 एप्रिल रोजी पुन्हा देशमाने यांनी संपर्क साधला असता पवारने आज दुपारपर्यंत पेमेंट होऊन गाडी भरून बाहेर पडेल असे सांगितले. परंतु त्यांनी गाडी भरून पाठवली नाही. त्यानंतर वारंवार संपर्क करूनही पवारने टोलवाटोलवी केली. तसेच ऑर्डरप्रमाणे अंबिका ऑईल इंडस्ट्रिजचे अजय शेजुल व दलाल साईदीप एंटर प्रायजेस पुणे यांनी माल न पाठवता दोघांनीही संगनमत करून 36 लाख 40 हजाराची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
24 तासात छडा
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, हवालदार रमेश चव्हाण, नाईक विलास मोहिते, कॉन्स्टेबल सतीश खोत यांनी संबंधित व्यापाऱयांची आवश्यक ती माहिती मिळवली. खासगी वाहनाने तपास पथक रवाना झाले. पुणे, सोलापूर, अहमदनगर असा 24 तासात 1 हजार कि.मी. प्रवास करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून तासगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 मेपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधिशांनी दिला असल्याचे सहायक निरीक्षक पंकज पवार यांनी सांगितले.








