प्रतिनिधी / कोल्हापूर
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये. जर मी त्यांची एक, एक प्रकरण बाहेर काढायला लागलो, तर त्यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही, असा सज्जड इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी आयोजित पत्रकार बैठकीत दिला. चांगला कारभार चाललेला गोकुळ दुध संघ मोडून खाण्यासाठीच विरोधक एकत्र आले आहेत, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या एका प्रचारसभेदरम्यान केला होता. याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी खरपूस शब्दात प्रत्युत्तर दिले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेसह साखर कारखान्याचा कारभार मी चांगला चालवला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही डॉ. डी.वाय.पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांना न्याय दिला आहे. संस्थेचा चांगला कारभार करण्याचा आम्हाला अनुभव आहे. पण महाडिक यांच्या भिमा साखर कारखान्यातील घोटाळे बाहेर काढले तर त्यांची पळताभूई थोडी होईल. दुधाचे टँकर, गोकुळच्या नोकरभरतीमधील भ्रष्टाचार हे सर्व जनतेसमोर आणले तर त्यांना जड जाईल.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दुध संघाच्या सत्तारुढ आघाडीतील काही संचालक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारामध्ये सत्तारुढ आघाडीविरोधात काही बोलायच नाही असे विरोधी आघाडी निश्चित करताना ठरले आहे. हा संघ दुध उत्पादकांच्या मालकीचा करण्यासाठी, दुधाला प्रतिलिटर दोन ते चार रुपये जादा दर आणि वासाच्या दुधाचा प्रकार बंद करण्यासाठी आम्ही गोकुळची निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे महाडिक यांनी तोंड सांभाळून बोलावे. उणेदुणे काढू नये असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
गोकुळ निवडणुकीसाठी भांडवली गुंतवणूक
गोकुळ निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांनी ठरावधारक मतदारांच्या यापूर्वीच गाठीभेठी घेतल्या असून त्यांच्याकडे भांडवली गुंतवणूक केली असल्याची मिश्किल टिफ्पणी मंत्री मुश्रीफ यांनी केली. ही सर्वसाधारण निवडणूक नसून यामध्ये मोजके ठरावधारक मतदान करणार आहेत. त्यामुळे कोरोना कालावधीतही या निवडणुकीसाठी कोणतीही अडचण नसल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
तर काचेचे रस्ते केले असते !
गोकुळ दुध संघाचे सभासद (ठरावधारक) आपल्या गावासाठी निधी देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे सभासदांच्या मागणीनुसार आणि जिह्याच्या सर्वागिण विकासासाठी मी त्यांना निधी देत आहे. गोकुळची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निधी देत नसून राज्याचा ग्रामविकासमंत्री या नात्याने देत आहे. भाजपच्या सत्ता कालावधीत जिह्याचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे बांधकाममंत्री पद होते. पण जिह्याच्या विकासासाठी त्यांनी आपल्या मंत्री पदाचा कोणताही वापर केला नाही. त्यांना विकासकामांची संधी होते. पण काहीही केले नाही. माझ्याकडे हे खाते असते तर काचेचे रस्ते केले असते, अशी स्पष्टोक्ती मंत्री मुश्रीफ यांनी केली.
गोकुळच्या मतदानासाठी तालुकानिहाय मतदान केंद्रे
सत्ताधाऱयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी न्यायालयामध्ये अनेकदा याचिका दाखल केल्या. त्यामुळे न्यायालयाचा अपमान होतो की काय ? अशी भिती आम्हाला वाटत होती. वास्तविक या निवडणुकीसाठी मोजके ठरावधारक मतदान करणार आहेत. तसेच तालुकानिहाय मतदान केंद्रे केल्यामुळे संबंधित तालुक्यातील मतदार तेथेच मतदान करणार आहेत. त्यामुळे गर्दी होणार नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
Previous Articleलांजा तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस
Next Article सांगली जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू , नवे 526 रूग्ण









