श्रीकृष्णासह रुक्मिणीचा द्वारकेत गृहप्रवेश मोठय़ा थाटामाटात संपन्न झाला. रमायुक्त जगन्निवास द्वारकेत आनंदाने राहू लागले. महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला म्हणाले – राजा! अशाप्रकारे भगवान श्रीकृष्ण गृहस्थ झाले. रुक्मिणी हरणाची ही सुंदर कथा मी तुला सांगितली.
एवं हरण पाणिग्रहण । तुज केलें गा श्रवण ।
ज्याचेनि श्रवणें जाण । दोष दारुण नासती ।
ग्रंथपीठिका संपूर्ण । कथेसी श्रीकृष्ण कारण ।
कळसा आलें निरूपण । प्रेम सज्जन जाणती ।
रुक्मिणी पाणिग्रहणाची ही कथा तू श्रवण केलीस. जे ही कथा ऐकतात त्यांचे दोष नाहीसे होतात. ही कथा पूर्ण करणारा तो परमात्मा श्रीकृष्णच आहे. त्याच्या कृपेनेच हे निरुपण मी केले हे प्रेमळ सज्जन श्रोते जाणतात.
रुक्मिणीहरणवार्ता ।जुनाट होय सर्वथा ।
परी पाणिग्रहण व्यवस्था । नवी कथा कवित्वाची।
ऐसा विकल्प मानाल झणीं । जें बोलिले श्रीव्यासमुनी ।
तोचि अर्थ विस्तारूनी । प्रगट केला प्राकृतें ।
यथाविधि पाणिग्रहण । मुळीं आहे व्यासवचन ।
तें सूत्रपाय निरूपण । श्लोकार्थ जाण बोलिलों ।
साच न मानी ज्याचें चित्त । तेणें पाहावें श्रीभागवत ।
तेथील श्लोकीच श्लोकार्थ । ऐसाचि असे सर्वथा।
राजे जिणोनि दारुण । भीमकी आणोनी आपण।
कृष्णें केलें पाणिग्रहण । हें निरूपण मुळींचें ।
येणेंचि पदें पदविस्तारिं । कथा चालिली पुढारी ।
खोडी ना ठेवावी चतुरिं । ग्रंथ निर्धारिं न पाहतां ।
जैसें वटबीज अल्पप्राय । परी विस्तार गगना जाय।
तैसीच हे कथा होय । थोडेनि बहू विस्तार ।
मूळ सांडूनि सर्वथा । नाहीं वाढविलें ग्रंथा ।
पाहतां मूळींच्या पदार्था । अर्थकथा चालिली ।
नाहीं ग्रंथारंभ संकल्प । नव्हता श्रोतयांचा आक्षेप।
ग्रंथीं उजळला कृष्णदीप । सुखरूप हरिकथा ।
जेणे हा ग्रंथ करविला। तो आरंभींच
उपरमला ।
पुढें ग्रंथ कैसा चालिला। बोलतां बोला न बोलवें।
नेणों काय कृष्णनाथा। हे आवडली ग्रंथकथा। तोचि होऊनि श्रोता वक्ता। अर्थ परमार्था आणिला । ये ग्रंथींचें निरूपण। जीवशीवां होतसे लग्न । अर्थ पाहतां सावधान । समाधान सात्त्विकां। येथें विवेकी व्हावा वक्ता । समाधान पाहिजे श्रोता।
त्याचेनि संवादे हरिकथा । सुख समस्तां
होईल ।
होऊनि अनुभवकसवटी । कथा चालिली मऱहाठी। वोवी न चले फुकासाठीं । श्रद्धा पोटीं धरिलिया । एकनाथ महाराज म्हणतात – श्रोतेहो! रुक्मिणीहरणाचा प्रसंग तर जुनाच आहे. आता हा काय नवीन, वेगळे सांगणार काय असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेल. असा विकल्प आपण मनात आणू नका. श्रीव्यासदेवांनी जी कथा संस्कृतमध्ये सांगितली, तिचाच विस्तार मी प्राकृत मराठी भाषेत केला आहे.








