वार्ताहर / दोडामार्ग:
कळणे मायनिंगमधील पाण्याचा बांध फुटून नुकसान होऊन तब्बल आठ दिवस झाले. मात्र, अद्यापही शासनाकडून तातडीची मदत नुकसानग्रस्त शेतकऱयांना देण्यात आलेली नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 15 ऑगस्टपासून पाण्याचा बांध फुटून वाहणाऱया पाण्यात बेमुदत उपोषणाला सुरुवात करू, असा इशारा कळणेतील नुकसानग्रस्त शेतकरी ग्रामस्थांनी गुरुवारी दिला. दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांची तहसील कार्यालयात भेट घेऊन त्यांना कळणेवासियांनी उपोषणासंदर्भातील निवेदन दिले.
गेल्या आठवडय़ात कळणे मायनिंगमध्ये साठवलेल्या पाण्याचा बांध फुटून हजारो लिटर पाणी व माती आसपासच्या घराघरांमध्ये तसेच शेती-बागायतीमध्ये घुसली. त्यात अनेक शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. साधारण पुढील वीस ते पंचवीस वर्षे उत्पन्न देऊ शकणाऱया या शेती-बागायती नष्ट झाल्या. या घटनेला आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही तातडीची मदत शासनाकडून देण्यात आलेली नाही. याकडे या उपोषणाद्वारे लक्ष वेधण्यात येणार आहे.
आमदार, खासदार व अधिकाऱयांच्या दौऱयाचे फलित काय? – मिलिंद नाईक
ही घटना घडल्यानंतर स्थानिक आमदार तसेच खासदार यांनी बांध फुटलेल्या ठिकाणाची तसेच नुकसानी झालेल्या भागाची पाहणी केली व शासनाकडून तातडीची मदत देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. तसेच नुकसानीचे पंचनामे व अन्य कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र, शासनाकडून अद्याप तातडीची मदत देखील शेतकऱयांना मिळाली नाही. मात्र, या सर्वांच्या दौऱयाचे नेमके फलित काय ? असा सवाल कळणेतील नाईक यांनी केला.
ग्रामस्थांच्या निवेदनात अनेक मागण्या
कळणे गावाला या मायनिंग प्रकल्पाचा भविष्यकाळात मोठा धोका असून हा प्रकल्प कायमस्वरुपी बंद करण्यात यावा. तसेच पुढील वीस ते पंचवीस वर्षांचे शेती उत्पन्न गृहीत धरून संबंधित मायनिंग कंपनीकडून तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. या घरांना या दुर्घटनेचा फटका बसला. त्यातील घरांची नुकसानी 15 लक्ष रुपये दाखविली आहे. मात्र, वस्तुत बऱयाच भागात पाणी- माती जैसे थे असून पाणी ओसरल्यानंतर काही घरांना भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. ते पाहता भविष्यात ही घरे पडण्याचा धोका आहे. शिवाय कळणे नदीपात्रात या माती व गाळ उपसा करून नदी शुद्ध करावी आदी मागण्या या निवेदनाद्वारे कळणे ग्रामस्थांनी केल्या आहेत. यावेळी मिलिंद नाईक, मानसिंग देसाई, अर्जुन देसाई, जयसिंग देसाई, पांडुरंग देसाई, रमाकांत देसाई, बाबाजी देसाई, अरुण परब, विलास परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









