प्रतिनिधी / कोल्हापूर
कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दवाखाना यार्डमध्ये शुक्रवारी दुपारी मोबाईल सापडला. हा मोबाईल दगडाने फोडून त्यावरील आयएमआयई नंबर खोडून तो मोबाईल कारागृहाच्या तटाबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहातील शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन नवनाथ रणदिवे (रा. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद वरिष्ठ तुरुंगअधिकारी एस. एल आडे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कळंबा मध्यवर्ती कारागृह गेल्या काही दिवसापासून मोबाईल प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आहे. 10 मोबाईल, पाऊण किलो गांजा, चार्जर कॉड, दोन पेन ड्राईव्ह 22 डिसेंबर रोजी कारागृहात फेकण्याचा प्रयत्न झाला होता. कारागृह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. मात्र कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल देत तत्कालिन अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली केली होती. त्यांच्या जागी चंद्रमणी इंदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सातत्याने कारागृहाची झडती घेण्याचे काम सुरू केले. यात 25 व 31 डिसेंबर या दोन दिवशी एकूण दोन मोबाईल, सात बाटया सापडल्या होत्या. यानंतर 5 जानेवारीला दोन मोबाईल, सीमकार्ड व दोन बॅटऱया मिळून आल्या होत्या. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 10 मोबाईलचा छडा लावून चौघांवर गुन्हा दाखल केला होता.
कारागृहात घडणाऱया घटानांच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी विशेषा झडती पथक नेमले आहे. हे पथक कारागृहात सर्च मोहिम राबवत असते. शुक्रवारी दिवसभर या पथकाकडून कारागृहात झडती मोहिम राबविण्यात येत होती. याचदरम्यान अधिक्षक इंदूरकर यांना कारागृहातील दवाखाना विभागात मोबाईल असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या विभागाची सखोल झडती घेण्याची सूचना त्यांनी केली. मात्र या ठिकाणी मोबाईल आढळून आला नाही. कारागृहातील काही बंदीजनांनी या ठिकाणी मोबाईल मिळाला असून तो शिपाई संशयित सचिन रणदीवे याच्याकडे असल्याचे सांगितले. यानुसारा सचिन रणदिवे असलेल्या ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. यामध्ये रणदिवे हा काही तरी कारागृहाच्या मुख्य तटबंदीवरुन फेकून देत असल्याचे दिसून आले. यानुसार रणदिवे याने याची चौकशी केली असता त्याने झडती दरम्यान आढळलेल मोबाईल दगडाने फोडून त्यानंतर टॉवर क्रमांक एक येथील मुख्य तटाच्या बाहेर फेकून दिल्याची कबूली दिली.
याप्रकरणाची कारागृह प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली असून मोबाईल प्रकरणातील मुख्य अपराध्याला वाचवून गुह्यातील पुरावा नष्ट करणे तसेच कारागृहाच्या सुरक्षीततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सचिन रणदिवे याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर करत आहेत.
—————————————–
सचिन रणदिवे याने मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार का केला याची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने कर्तव्यात कसूर केल्याची प्राथमिक माहिती असून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती कारागृह अधिक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी दिली.
——-
संशयित शिपाइ सचिन रणदिवे याने मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार कोणासाठी केला याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याला लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.