पक्क्या कैद्यांना ४५ दिवसांची पॅरोल रजा मिळणार
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुमारे २०१ बंदींना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ३० एप्रिलला निर्णय होण्याची शक्यता असल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील कारागृहातील ७ वर्षाच्या आतील शिक्षा असणाऱ्या बंदींना जामीन व पॅरोल देण्याची हलचाली सुरू झाल्या आहेत. न्यायालयाच्या मंजुरीने सात वर्षाच्या आतील गुन्हे दाखल असलेल्या न्यायालयीन बंदींना यापूर्वीही जामीन देण्यात आला होता. यात कळंबा मध्यवर्ती कारागृहाने सुमारे १२५ बंदींबाबतचा अहवाल पाठविला होता. त्यानुसार प्रशासनाच्या प्रस्तावानुसार तात्काळ ६१ बंदींना जामीन मिळाला होता.
कारागृहात सात वर्षाच्या आतील गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्यांना जामिन मिळावा अशी मागणी केली होती. याबाबत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश, सचिव यांची समिती नेमण्यात आली आहे. न्यायालयाने या समितीला याबाबतचा निर्णय तातडीने घेऊन त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. त्यावर ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. बंदींना पॅरोल देण्यास मंजुरी मिळाली तर कळंबा कारागृहातील सुमारे २०० बंदीं जणांना पॅरोल व जामिन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाला कोरोनाची असलेली भिती कमी होण्याची शक्यता आहे.









