प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असतानाही कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा आहे. रूग्णालयातील व्हेंटीलेटर्स धूळखात पडले असून त्याचा रूग्णांसाठी वापरच होत नाही. या निषेधार्थ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयासमोर निदर्शने केली. आरोग्य प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पाढा वाचत घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णालय सुरू करून याठिकाणी ५ व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, या व्हेंटीलेटर्सचा रूग्णांसाठी काहीच वापर होत नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. रुग्णालयात औषधांचाही तुटवडा असून रिक्त पदांमुळे कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड सुरू आहे. एम.डी. फिजिशियन वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली असताना देखील हे पद अजूनही रिक्तच आहे.
यापार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाला खडबडून जागे करून रूग्णांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयासमोर निदर्शने केली डॉ. प्रकाश जांभुळकर यांची कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात नियुक्ती असतानाही ते रत्नागिरी शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांना तातडीने कळंबणी रूग्णालयात हजर होण्याच्या सूचना द्याव्यात. कोविड सेंटरमध्ये मुबलक औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, एक्सरे मशिन चालू करून द्यावे तसेच सिटी स्कॅन मशिन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
यादरम्यान, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर एम. डी. फिजिशियन डॉक्टर्सची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतरच काँग्रेसचे कार्यकर्ते शांत झाले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब, माजी नगरसेवक बशीर मुजावर, आरिफ मुल्लाजी, महम्मद काझी, नासिर बडे, अनंत मोरे, मुजीब माखजनकर, अनिल सदरे, विजय जैन, सलमान मुरूडकर, अशोक नलावडे, तजम्मुल बेग, मुदस्सर पटेल, रवींद देवरुखकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleमहाराष्ट्रात मागील 24 तासात 311 पोलिसांना कोरोनाची लागण
Next Article लोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह









