15 दुकाने जळून खाक; कोटी रुपयांची हानी
प्रतिनिधी/ म्हापसा
राज्यात सरत्या वर्षाला निरोप देण्याची धूम सुरू असतानाच पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास नववर्षाच्या उदयालाच अग्नी तांडव झाले. गौरववाडा-कळंगूट येथे डेल्टनच्यासमोर असलेल्या दुकानांना लागलेल्या आगीत 14 कपडय़ांची दुकाने व एक हॉटेल मिळून पंधरा दुकाने जाळून खाक झाली. या आगीत कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून दुकानांच्यासमोर पार्क करून ठेवलेल्या आय 20 कार तसेच दुकानांच्या मागे पार्क केलेल्या 3 दुचाकीचांही समावेश आहे.
नववर्षाच्या प्रारंभीच या दुकानांना आग लागल्याने कळंगूट ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. विक्रीसाठी आणलेले नवीन कपडे आगीत पूर्णतः जळून खाक झाले. शिवाय रोख रक्कमही जळून खाक झाली. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी यात घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एसमोलडा फर्नांडिस कुटुंबियांच्या मालकीची ही जागा असून गेल्या 6 वर्षापूर्वी येथे 14 कपडय़ांची दुकाने व एक हॉटेल मिळून 15 दुकाने फर्नांडिस यांनी बांधून भाडेपट्टीवर दिली होती. परप्रांतीय व्यापारी ही दुकाने चालवित होते. हॉटेलचे मालक राहुल मौर्या शुक्रवारी रात्री 12.30 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल बंद करून घरी गेले होते. उत्तररात्री 3.30 वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची माहिती मौर्या यांना येथील दुकान मालकांनी दिली. आगीचे लोळ सुमारे माडाच्या उंची इतके होते. अग्नितांडव पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये भीताचे वातावरण निर्माण झाले.
नाताळ आणि नवीन वर्षासाठी पर्यटक राज्यात मोठय़ा प्रमाणात आले असल्याने सर्वांनी आपली दुकाने कपडे आणून भरली होती. एका दुकानात सुमारे 20 ते 25 लाखांचा कपडय़ांचा माल होता, अशी माहिती एका दुकान मालकाने दिली.
या जमिनीचे मालक एलमोलडा फर्नांडिस यांना कुणी अज्ञात व्यक्तीने तुला काय ते दाखवितो असे म्हणून तेथून पळ काढला होता, अशी माहिती घर मालकाचा मुलगा नॉयेल फर्नांडिस यांनी पत्रकारांना बोलताना दिली.
कळंगुट येथे रात्री उशिरा आम्हाला आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यावर त्वरित बंबसह घटनास्थळी धाव घेतली. आगीचे रुप पाहून म्हापशाहून अन्य एक बंब मागविण्यात आला, अशी माहिती पीळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी रुपेश सावंत यांनी दिली. जवानांनी अथक प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात येण्यास त्यांना खूप उशीर लागला.
यावेळी रस्त्याशेजारी पार्क करून ठेवण्यात आलेल्या पर्यटकांच्या नव्या कोऱया कारगाडीनेही पेट घेतल्याने गाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
सरकारदरबारी आर्थिक मदतीची मागणी
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱयांनी आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु नवीन कपडय़ांचे गठ्ठे त्यांना आगीपासून वाचवता आले नाहीत. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी घातपाताचा संशय नाकारता येत नसल्याचे राहुल मौर्या याने सांगितले. व्यावसायिकांनी स्थानिक आमदार मायकल लोबो यांची भेट घेऊन आपली परिस्थिती कथन केली व सरकार दरबारी आर्थिक मदतीची मागणी केल्याचे मौर्या यांनी सांगितले.
पीळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी रुपेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली दामोदर पेडणेकर, आनंद बांदेकर, श्रीकांत सावंत, रुद्रेश पांढरे, निखिल सानवाल यांनीही आग आटोक्यात आणली.
परप्रांतीय व्यापाऱयांवर संकट
या भागात रेडीमेड कपडय़ांची दुकाने थाटून देशी तसेच विदेशी पर्यटक गिऱहाईकांवर अवलंबून असलेल्या तसेच आपला छोटेखानी व्यवसाय सांभाळणाऱया अनेक परप्रांतीय लोकांवर नववर्षाच्या पहिल्या दिवशीच मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
आगीचे कारण गुलदस्त्यातः रुपेश सावंत
कळंगूट- कांदोळी मुख्य रस्त्याला लागूनच ही दुकाने आहेत. या ठिकाणी एक हॉटेल होते त्या हॉटेलात भरलेले मोठे गॅस सिलिंडर होते ते ब्लास्ट झाले असते तर मोठी दुर्घटनाही घडली असती परंतु तसे झाले नाही. आग नेमकी कशी लागली हे कारण गुलदस्त्यात आहे, अशी माहिती पीळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी रुपेश सावंत यांनी दिली.









