प्रतिनिधी/ म्हापसा
कळंगूट बागा येथे असलेल्या रेडीमेड कपडय़ाच्या दुकानांना व एका बार ऍण्ड रेस्टॉरंटला आग लागून या आगीत सुमारे 70 लाखाचे नुकसान झाले. 3 दुकाने व रेस्टॉरंट मिळून पूर्णतः जळून खाक झाली. लॉकडाऊन असल्याने येथे सर्वकाही बंद होते. वीज पुरवठाही खंडीत झाला होता मात्र आग नेमकी कशी काय लागली हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती स्थानिक मंत्री मायकल लोबो यांना दिल्यावर त्यांनी त्वरित अग्निशामक दलास माहिती देऊन दलास बोलावून घेतले. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. पीळर्ण अग्निशमन दलाचे अधिकारी दामोदर पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान लागली. कळंगूट येथे असलेल्या प्रमोद शिंदे, चंद्रशेखर पुजारी व जहांगीर अहमद शेख यांनी येथे कपडय़ाची दुकाने भाडेपट्टीवर घेतली होती. या तिघांनीही आपल्या दुकानातील प्रत्येकी 20 लाख रुपयाचे कपडे जळून खाक झाल्याचे म्हटले आहे. तेथे बाजूला असलेल्या लिली कायतान आंद्राद यांच्या मालकीचे बार ऍण्ड रेस्टॉरंट जळून खाक झाले. या आगीत रेस्टॉरंटचे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले. एकूण 4 दुकानाचे 65 लाखांचे नुकसान झाले. आजूबाजूचे सामान मिळून अन्य पाच लाख मिळून एकूण 70 लाखाचे या आगीत नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच पणजी अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली पीळर्ण दलाचे उपअधिकारी दामोदर पेडणेकर, आनंद बांदेकर, विराज खांदोळकर, विशाल पाटील, राजेश पिळर्णकर तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी, उपअधिकारी प्रमोद महाले, देवेंद्र नाईक, अर्जुन धावस्कर, संजय फडते, अशोक वळवईकर यांनी ही आग विझवली. एकूण 2 बंबचा वापर करण्यात आवा. कळंगूट पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांनी एका खासगी टँकरची व्यवस्था केली. बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.









