ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे प्रादेशीक साखर सह संचालकांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाचे काम गतीमान करुन कामगारांना दिलासा द्याव अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतुक कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. प्रादेशीक साखर सहसंचालक सदाशिव जाधव यांना याबाबतचे निवेदन दिले.
महामंडळाच्यावतीने ऊसतोड कामगार, मुकादम यांना द्यायच्या सोयी- सवलतींची योजना तयार करणे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेशी, कामस्वरुपी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. यापैकी आर्थिक तमतूद करण्याबाबतचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला आहे. त्यानुसार राज्यातील ऊस खरेदीवर प्रतिटन दहा रुपये प्रमाणे होणारी रक्कम आणि तितकीच रक्कम राज्य सरकारकडून महामंडळाकडे उपलब्ध होणार आहे.
संत भगवानबाबा वसतीगृह योजना या नावाने ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 41 तालुक्यासाठी 82 वसतीगृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला 10 तालुक्यासाठी 20 वसतीगृहे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारासाठी सिटू संघटनेच्या प्रदीर्घ लढयानंतर कल्याणकारी महामंडळाच्या बाबतीतील हे निर्णय झाले आहेत. परंतु 27 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर झालेल्या या निर्णयाची अंमलबजावणी पुरेशा गतीने सुरु झालेली नाही. याबाबत या कामगारांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचा विचार करुन महामंडळाला गती द्यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी डॉ. सुभाष जाधव, कॉ. दिलीप आदमापुरे, आनंदा डफळे, पांडूरंग मगदूम, नामदेव जगताप, आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
1-राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांची, मुकादमांची ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी सुरु करावी.
2-नोंदीत ऊसतोडणी व वाहतूक कामगार, मुकादम यांना महामंडळाचे ओळखपत्र आणि सेवापुस्तिका देण्यात यावी.
3-कल्याणकारी महामंडळाकडून ऊसतोडणी व वाहतूक कामगारांना द्यावयाच्या सेवा-सुविधा बाबतची योजना संघटना प्रतिनिधीशी चर्चा करुन निश्चित करावी.
4-ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या कामकाजासाठी प्रतिनिधी समिती आणि त्यावर महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे दोन प्रतिनिधी घ्यावेत.