पात्र स्थानिक उमेदवारावर अन्याय, डॉ. शिवाजी शेट यांचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील आदर्शवत अशा कॉलेज ऑफ आर्टस शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यासारख्या महत्वाच्या पदावर नियुक्त करण्यासाठी पात्र गोमंतकीय उमेदवारास डावलून बिरगगोमंतकीय महिलेची निवड करण्यात आली आहे. मुलाखतीचा केवळ फार्स करून झालेली सदर निवड पूर्णपणे बेकायदेशीर व गोमंतकीयांवर अन्याय करणारी असून त्या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा डॉ. शिवाजी शेट यांनी दिला आहे. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फाईन आर्टमध्ये डॉक्टरकी मिळविणारा आपण पहिला गोमंतकीय आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पॅलोशिप प्राप्त केल्या आहेत. त्याशिवाय गोव्यासह मुंबई, बंगळूर, कोलकाता, आदी राज्यात विद्यादानाचे काम केले आहे. श्रीलंका, विश्वभारती येथे पेपर्स सादर केले आहेत. पेंटिंग्स, स्कल्पचर्स, ग्राफिक्समध्ये आपला हातखंडा असून ड्रामा, थिएटर या क्षेत्रातही योगदान दिलेले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपले वडील मुकुंद शेट हे स्वातंत्र्यसैनिक होते, अशा उमेदवारावर अन्याय करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
15 वर्षे वास्तव्य, कोकणीची अट कुठे गेली?
कॉलेज ऑफ आर्टस या संस्थेत प्राचार्यपदी निवड करण्यासाठी जीपीएससीद्वारे मुलाखत घेण्यात आली होती. त्यासाठी एक गोमंतकीय व दुसरा बिगरगोमंतकीय असे केवळ दोनच उमेदवार होते. बिगर गोमंतकीय असलेल्या महिला उमेदवाराकडे गोव्यात 15 वर्षे वास्तव्याचा दाखला नाही. तसेच तिला कोकणीचेही ज्ञान नाही. त्यामुळे सदर पदासाठी आपण सर्वस्वी पात्र होतो. तरीही सदर महिलेची निवड करण्यात आली, असा दावा शेट यांनी केला आहे.
मुलाखत होती केवळ फार्स
सदर महिला उमेदवार ही मुंबईतील रहेजा स्कूलची साहाय्यक प्राध्यापक आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे आणावी, असा ई-मेल पाठविण्यात आला होता. त्यानुसार आपण तब्बल दोन फाईल्स भरून प्रमाणपत्रे नेली होती. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीवेळी ती प्रमाणपत्रे आत नेण्यापासून रोखण्यात आली. याऊलट दुसऱया उमेदवाराने एकही प्रमाणपत्र आणले नव्हते, तरीही तिचीच निवड करण्यात आली. यावरून सदर मुलाखत म्हणजे केवळ फार्स होता व त्या महिलेची निवड आधीच निश्चित झाली होती हेच सिद्ध होते, असे डॉ. शेट म्हणाले. सदर बेकायदेशीरपणात जीपेससीच्या नोरोन्हा यांचा हात असल्याचा आरोपही शेट यांनी केला आहे.
सदर पदासाठी जीपीएससीने 2019 मध्ये प्राचार्यपदासाठी जाहिरात दिली होती. त्यानुसार आपण अर्ज केला होता. त्यावेळी 8 उमेदवार होते. त्यातही आपणच सर्वस्वी पात्र होतो. तरीही त्यावेळी शिक्षकी अनुभव नसल्याचे कारण देऊन नापास करण्यात आले. प्रत्यक्षात आपणाला सुमारे 14 वर्षांचा अनुभव आहे. मात्र तो जमेस धरण्यास नकार दिला. या अन्यायाविरोधात आपण खंडपीठात याचिका दाखल केली व न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिला.
त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये पुन्हा जाहिरात देण्यात आली. त्यावेळीही आपण अर्ज केला व मुलाखतीसाठी हजर झालो. केवळ दोनच उमेदवार होते. मात्र आपणाला डावलून बिगर गोमंतकीय उमेदवाराची निवड करण्यात आली.
अशाप्रकारे महत्वाच्या संस्थांमध्ये प्रमुख पदांवर बिगरगोमंतकीयांची नियुक्ती होऊ लागली तर भविष्यात गोमंतकीयांना कुणी वालीच राहणार नाही, अशी भीती शेट यांनी व्यक्त केली. अशावेळी सर्व गोमंतकीयांनी अन्य राज्यात जाऊन नोकऱया कराव्या का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महेश वेंगुर्लेकरकडून कन्येची वर्णी? दरम्यान, गोवा कॉलेज ऑफ आर्टसे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांनी स्वतः सेवेत असताना त्याच महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून स्वतःच्या कन्येची नियुक्ती केली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट पदवी नसल्यामुळे प्रारंभी तिची कंत्राटी पद्धतीने वर्णी लावण्यात आली व दरम्यानच्या काळात दुरस्थ शिक्षणाद्वारे खुल्या विद्यापीठातून प्रमाणपत्र मिळवून दिले. अशाप्रकारे वेंगुर्लेकर यांनी स्वतः निवृत्त होण्यापूर्वी जानेवारी महिन्यात कन्येची नोकरी कायम केली, असा दावा शेट यांनी केला आहे.