ड्रिम टॉकीज प्रॉडक्शन प्रस्तुत सचिन दुबाले पाटील निर्मित, तू परत ये हे मराठी गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. स्वरूप सावंत दिग्दर्शित तू परत ये हे गाणे एस. सागर यांनी लिहून संगीतबध्द केलेले आहे. तर सागर फडकेने हे गाणे गायले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन आणि नकारात्मक वातावरणात सर्वांना प्रेरणा आणि उभारी देण्यासाठी या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रथमेश परब, प्रणव रावराणे, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, विजय आंदळकर, निखिल राऊत, समीर धर्माधिकारी, सिध्देश्वर झाडबुके, जयेश चव्हाण आणि स्वरूप सावंत या 10 कलाकारांचा या गाण्यात समावेश आहे. या गाण्याचे निर्माते सचिन दुबाले पाटील ह्यांनी आत्तापर्यंत कॉलेज डायरी, धुमस, खिचिक अशा 7 मराठी सिनेमांमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे. सचिन या गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतात, सध्या लॉकडाऊनमुळे सिनेसफष्टी बंद आहे. सगळीकडे कोरोनामुळे नकारात्मक वातावरण आहे. अशावेळी नवी उमेद जागण्यासाठी एका सकारात्मक गाण्याची निर्मिती करावी असं वाटलं, म्हणून तू परत ये हे गाणं आम्ही घेऊन आलो आहोत. आपलं जीवन सुरळीत व्हावं, म्हणून देवाला आर्जव करणारं हे गीत आहे. या गाण्याची संकल्पना माझा मित्र स्वरूप सावंत ह्याची आहे.
दिग्दर्शक स्वरूप सावंत म्हणतात, सध्या लॉकडाऊनमुळे सगळ्यांना सक्तीने घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे सगळेच आपले पूर्वीचे दिवस आठवत आहेत. मलाही माझे पूर्वीचे आयुष्य आठवताना माझ्या मनात सर्वांना बळ आणि उत्साह देणारं गाणं घेऊन यावं, अशी कल्पना सुचली. म्हणून मग मी माझे मित्र सचिन दुबाले पाटील आणि विष्णु घोरपडे यांना ही कल्पना ऐकवली. त्यांनाही ती आवडल्याने त्यांनी या गाण्याची निर्मिती केली. या गाण्यातून आम्ही देवाला साकडं घालतोय की, तू परत ये, काही तरी चमत्कार कर आणि आमचे ते जुने दिवस आम्हांला परत दे.
अभिनेता अक्षय टंकसाळे गाण्याविषयी सांगतो, सध्याच्या परिस्थितीत या गाण्याच्या शब्दांशी आपल्या सगळ्यांनाच साधर्म्य जाणवेल. आपण काही काळापूर्वी ज्यापध्दतीने सक्रिय होतो, तसे पुन्हा व्हावे, यासाठी तू परत ये हे गाणं आहे. सध्याची मरगळ दूर होऊन पुन्हा सगळे टवटवीत आणि प्रफुल्लित व्हावे. डॉक्टर, नर्स, पोलिस या सगळ्यांना सध्या करावा लागलेला संघर्ष संपावा, आणि पूर्वीसारखे आनंदाचे दिवस परतावे, अशी इच्छा ह्या गाण्यातून व्यक्त केली आहे. अभिनेता प्रथमेश परब म्हणतो, हे खूप प्रेरणादायी गाणं आहे. सध्या आपण बऱयाचशा सवयीच्या गोष्टी मिस करतोय. मी मुंबईकर म्हणून रस्त्यावरचं ट्रफिक आणि गर्दीला मिस करतोय. मित्रांना भेटणं मिस करतोय. हे सगळं परत यावं ही माझी ही इच्छा आहे. आणि याच भावना गाण्यातून व्यक्त झाल्या आहेत.’’









