संपर्क रस्त्यांवर मोठमोठी भगदाड : शेतकऱयांचे हाल : वाहतूक झाली बंद : लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम

वार्ताहर /किणये
देशाचा विकास व्हायचा असेल तर प्रथम ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. कारण ग्रामीण भागावरच देशाच्या विकासाचे सूत्र अवलंबून आहे. यामुळे आधी खेडय़ाकडे चला असा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिला होता. मात्र, सद्यस्थितीत खेडेगावांची परिस्थिती वेगळीच निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांकडे अधिकाऱयांचे अक्षरशः दुर्लक्ष झाले आहे. याची प्रचिती बेळगाव तालुक्मयातील अनेक मुख्य व संपर्क रस्त्यांची अवस्था पाहिल्यास दिसून येते.

बेळगाव तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बहुतांश रस्ते खड्डेमय बनलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना नेहमीच त्रास होतो. पण सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यावेळीही तेच होते. यावरच चर्चा होते अन् नागरिकांना मात्र खड्डेमय रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागतो आहे. कर्ले-बेळवट्टी गावांचा संपर्क तुटला आहे. कारण दोन्ही गावांच्या संपर्क रस्त्यावर ठिकठिकाणी भली मोठी भगदाड पडलेली आहेत. खड्डय़ांनी रस्ताही पूर्णपणे व्यापून गेला आहे.
चार-पाच वर्षांपासून कर्ले-बेळवट्टी संपर्क रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सध्या तरी दोन्ही गावांचा संपर्क तुटल्यामुळे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेले आहेत. या रस्त्याला कोणी वालीच नाही का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
कर्ले गावापासून बेळवट्टी गावाला जोडणारा अंदाजे साडेचार ते पाच किलोमीटरचा रस्ता स्थानिक शेतकरी व नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून रोज दूध डेअरी टेम्पो, शेतकऱयांची ट्रक्टरसह इतर वाहने ये-जा करायची. पण सध्या रस्त्याची अवस्थाच वेगळय़ा स्वरुपाची व वाहतुकीस उपयोगी न पडल्याने ही सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
लोकप्रतिनिधींचे आश्वासन

कर्ले-बेळवट्टी संपर्क रस्त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष झाले आहे. महापूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱयांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. ही समस्या गेल्या दोन वर्षांपासून चालू असून आम्ही बेळगावच्या लोकप्रतिनिधींना सांगितले. दोनच दिवसांपूर्वी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बेळगाव ग्रामीणचे बीजेपी अध्यक्ष विनय कदम यांना सांगितले. त्यांनी या रस्त्याबाबत चर्चा करून त्याच्या कामकाजाचे आश्वासन दिले आहे.
– नरसिंग देसाई
अन्यथा आंदोलन छेडणार

कर्ले-बेळवट्टी रस्ता सध्या वाहतुकीस बंद पडलेला आहे. याकडे लक्ष कोण देणार? रस्त्यावरून सर्वच वाहतूक बंद पडलेली आहे. लोकांना व वाहनधारकांना पेट्रोल फुकटचा वाया घालवावा लागत आहे. यामुळे आमच्या भागातील वाहनधारकांचे नुकसान होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार आहोत.
– एन. के. नलवडे
दुरुस्तीबद्दल कोणाला विचारावे?

कर्ले-बेळवट्टी रस्ता इतका खराब झाला आहे की याच्या दुरुस्तीबद्दल कोणाला विचारावे हेच कळत नाही. ग्रामीण भागाच्या समस्यांकडे प्रशासन इतके दुर्लक्ष का करत आहे, इतकाच माझा प्रश्न आहे. आम्ही स्थानिक लोक आंदोलन केल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?
– वसंत सांबरेकर, ग्रा. पं. सदस्य.









