वार्ताहर / कुंभोज
कर्मवीर भाऊराव पाटील समुह विद्यापीठ घोषणे नंतर कर्मवीरांचे जन्मगाव कुंभोज येथे आनंदोस्तव साजरा करण्यात आला. बुधवार, दि ५ मे २०२१ रोजी महाराष्ट्र शासन राज्य मंत्रिमंडळाने कर्मवीरांची कर्मभूमी सातारा येथे ‘कर्मवीर भाऊराव पाटील समुह विद्यापीठ’स्थापनेचा उल्लेखनीय निर्णय घेतला. सदर निर्णयाने कर्मवीर आणांचे जन्मगाव कुंभोज येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुंभोजचे नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व कर्मवीर शैक्षणिक संकुलातील रयत सेवकांनी एकत्रित येऊन कर्मवीर आण्णा व रयत माउली लक्ष्मीबाई पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर फटाके व आतिषबाजी करीत कर्मवीर आणांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर निनादून सोडला. राज्याचे मुख्यमंत्री.उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या समूह विद्यापीठाला तत्वतः मान्यता देण्यात आली. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने समुह विद्यापीठ निर्माण करणे शक्य व्हावे यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत जरी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यभरातील उच्च शैक्षणिक संस्था अंतर निहाय विखुरण्यामधील मोठी तफावत दूर करण्याकरिता समुह विद्यापीठे स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.
‘रयते’चे हे विद्यापीठ पूर्ण अनुदानित व शासनाच्या मान्यतेचे असणार आहे. शैक्षणिक अधिकार रयत शिक्षण संस्थेकडे असणार असून विद्यार्थ्यांची सर्व कौशल्ये विकसित करणारा, स्टार्टअप चालना आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यासक्रम असणार आहे. तसेच परीक्षा पद्धती देखील पूर्णतः वेगळी असणार आहे. भविष्यात संस्थेची सर्व महाविद्यालये या कर्मवीर भाऊराव पाटील समुह विद्यापीठाच्या कक्षेत येऊ शकतील. या घोषणेने तब्बल सत्तर वर्षापूर्वी कर्मवीर अण्णांनी पाहिलेले ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न साकार होणार आहे.
२००९ साली कुंभोज येथे सुरु केलेल्या कर्मवीर शैक्षणिक संकुलात प्लेग्रुप ते दहावीचे वर्ग चालू आहेत तसेच चालू शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमातील अकरावी सायन्स व कॉमर्स अशा दोन तुकड्यांची सुरुवात केल्याने कुंभोज पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना इचलकरंजी व पेठवडगाव येथे जाण्याचा फेरा व वेळ वाचणार आहे.रयत विद्यापीठ घोषणा आनंदोत्सव कार्यक्रमावेळी जवाहरचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्तांची उपस्थिती होती.