परीक्षा नियोजनात अडचणी; विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी विद्यापीठातील 200, महाविद्यालयातील 1200 असे एकूण चौदाशे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज गुरुवारी लेखणीबंद आंदोलन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ समोर ठिय्या आंदोलन केल्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले.
राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू केलेला सातवा वेतन आयोग विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अद्यापही लागू न झाल्याने विद्यापीठ कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट आहे. अनेक वेळा मंत्रालय स्तरावर आश्वासनाशिवाय काही न मिळता पदरी निराशा आल्याने ऐन परीक्षेच्या काळात कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर युनिव्हर्सिटी ऑफिसर फोरम, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अधिकारी संघटना या संघटनांच्या संयुक्तरित्या ७ वा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना व इतर न्याय मागण्यासाठी आज 24 सप्टेंबर पासून लेखणी बंद व ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सर्व अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने लेखणीबंद आंदोलनात सहभागी झाले. सर्वांनी प्रशासकीय इमारती समोर एकत्र येऊन ७ वा वेतन लागू होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला. कर्मचार्यांच्या या आंदोलनामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या परिक्षा व अनुषंगिक कामकाज बंद असल्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झालेली आहे.
या आंदोलनप्रसंगी सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना अध्यक्ष गजानन काशीद,उपाध्यक्ष नितीन मुंडफणे, रुपाली हुंडेकरी, महासंघ उपाध्यक्ष रविराज शिंदे, महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे, ऑफिसर फोरमचे अध्यक्ष श्री प्रशांत चोरमले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित जगताप, कास्ट्राईब कर्मचारी संघटना अध्यक्ष मलकारसिद्ध हैनाळकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. वसंतराज सपताळे व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








