प्रतिनिधी / सातारा :
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सातारा पालिकेचे कर्मचारी, अधिकारी हे झोकून देवून काम करत आहेत. मात्र, त्याच लॉकडाऊनचा तोटा म्हणून सातारा पालिकेच्या या कर्मचाऱयांना गेल्या महिन्याचे वेतन झाले नसल्याने पालिकेत कुजबुज सुरु झाली आहे. याची खबर मिळताच वेतन धनादेशावर सही करुन कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न पालिकेकडून झाला आहे. दहा दिवस वेतन न झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांचे काळवंडलेले चेहरे मोबाईलवर मेसेज येताच टवटवीत झाले.
लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार बंद होते. त्या काळात फक्त पालिकेचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर होते. शहरातील कोरोना नियंत्रणात आणण्याचे काम कर्मचारी करत आहेत. असे असताना त्यांनाच दर महिन्याला होणारा पगार हा एक तारखेला होतो. मात्र, गत महिन्यात कडक लॉकडाऊन असल्याने शहरातील बँका बंद होत्या. त्याचा फटका पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर झाला आहे. नऊ दिवस झाले तरीही पगार नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांच्या नजरा पगार कधी होईल याकडे लागुन राहिल्या आहेत. त्याबाबत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बँका बंद होत्या. आरटीईजीएस प्रणाली होत नव्हती. त्यामुळे पगार झालेला नव्हता. आता बँका सुरु झाल्या आहेत. चेकवर सही केली आहे. आज पगार झालेला आहे, असे त्यांनी सांगितले.









