प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण नगरपालिकेतील एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यामुळे अन्य कर्मचाऱयांना त्याची बाधा होऊ नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून 1 आणि 2 रोजी पालिका कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा नीतू देसाई यांनी दिली.
पालिकेतील एक कर्मचारी बाधित आढळल्यानंतर आपण लगेच पालिकेचे मुख्याधिकारी सतीश प्रभू यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आणि कार्यालय पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या पालिका कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून सर्व कर्मचाऱयांना घरी पाठविण्यात आले आहे. पालिका कार्यालय आणि परिसराचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर पूर्ववत कार्यालय सुरू होईल. या कालावधीत जी जनतेची गैरसोय होईल ती सहन करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवावी, असे आवाहन नगराध्यक्षा देसाई यांनी केले. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून वागावे, मास्क वापरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.








