वृत्तसंस्था/ गांधीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या 8 व्या दीक्षांत सोहळय़ात संबोधित केले आहे. देश स्वतःच्या कार्बन फूटप्रिंटला 30-35 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या लक्ष्यासह वाटचाल करत आहे. चालू दशकात स्वतःच्या ऊर्जा गरजांमध्ये नैसर्गिक वायूची हिस्सेदारी 5 पटीने वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले आहे.
विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळय़ाला दृकश्राव्य प्रणालीद्वारे संबोधित करताना मोदींनी संस्थेतून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी देशाची नवी शक्ती ठरणार असल्याचे उद्गार काढले आहेत. अशाप्रकारच्या विद्यापीठाचे भविष्य काय असे लोक एकेकाळी विचारत होते, परंतु येथून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि विद्यापीठात शिकविणाऱया प्राध्यापकांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. महामारीमुळे पूर्ण जगाच्या ऊर्जा क्षेत्रातही मोठे बदल घडून येत असताना हे विद्यार्थी पाऊल टाकणार आहेत. अशा स्थितीत भारतीय ऊर्जाक्षेत्रात विकासाची, उद्यमशीलतेची, रोजगाराच्या अमाप संधी असल्याचे मोदी म्हणाले.
जग संकटात असताना पदवीधर होणे सोपी बाब नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या क्षमता या आव्हानांपेक्षाही खूपच मोठी आहे. समस्या काय आहे यापेक्षा तुमची गरज काय हे अधिक महत्त्वपूर्ण आहे. यशस्वी व्यक्तींसमोर समस्या नसतात असे नाही, परंतु जे आव्हानांना सामोरे जातात, त्यांच्यावर मात करतात, तेच यशस्वी होतात असे मोदींनी म्हटले आहे.
यशाचा मंत्र
जीवनात काही करून दाखविणारे, जबाबदारीची भावना असणारे लोकच यशस्वी होतात. जबाबदारीला भार मानणारे अपयशी ठरतात. जबाबदारीची भावना व्यक्तीच्या जीवनात संधीला जन्म देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.









