न्यायालय-सरकारी कार्यालयांचे परिसर सामसूम
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे संपूर्ण घडीच विस्कटली आहे. अचानकपणे विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे शनिवार आणि रविवार सर्वत्र शुकशुकाट पसरत होता. आता विकेंड कर्फ्यू मागे घेतला असला तरी चौथा शनिवार असल्यामुळे न्यायालये, सरकारी कार्यालयांच्या परिसरात शनिवारी शुकशुकाट दिसून आला.
न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार नेहमी गजबजलेले असते. मात्र कोरोनामुळे मागील दोन आठवडे विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे मागील आठवडय़ातील शनिवार आणि रविवार पूर्णपणे शुकशुकाट पसरला होता. शुक्रवारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकेंड कर्फ्यू मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र चौथा शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांना सुटी असते. याचबरोबर उच्च न्यायालयाने यापूर्वीच शनिवारी सुटी जाहीर केली होती. त्यामुळे न्यायालयेदेखील बंद होती. त्यामुळे शनिवारी या परिसरात अत्यंत शांतता पसरली होती.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये भीती आहे. यातच जिल्हाधिकाऱयांसह अनेक सरकारी अधिकारी, तसेच पोलीस अधिकाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी या आजारामुळे अधिक धोका नसल्याने आता मुख्यमंत्र्यांनीच निर्बंध हटविण्यास सुरुवात केली आहे. सरकारी सुटय़ा अधिक असल्याने सर्वसामान्य जनतेची कामे होणे अवघड झाले आहे. तेव्हा या सुटय़ांमध्ये बदल करावा आणि नियमित काम सुरू करावे, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
काही सुटय़ा रद्द केल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सरकारी कर्मचाऱयांना अधिक सुटी मिळाली आहे. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. तेव्हा यावषी सुटय़ा रद्द कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.









