बेंगळूर/प्रतिनिधी
२३ ऑगस्टपासून अकरावी आणि बारावीसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यापीठपूर्व शिक्षण विभागाने नियमावली जारी केली आहे. राज्यातील महाविद्यालयांना ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने वर्ग सुरु करण्यास सांगितले आहे.
दरम्यान शिक्षण विभागाने जारी केलेल्या नियमावलीनुसार “महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दोन तुकड्यांमध्ये विभागले पाहिजे आणि पर्यायी दिवशी वर्ग आयोजित केले पाहिजेत. उदाहरणार्थ, जे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी ऑफलाइन वर्गात उपस्थित राहतात, त्यांनी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी ऑनलाईन वर्गात उपस्थित राहावे, ”असे सांगितले आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १०० पेक्षा कमी आहे आणि योग्य पायाभूत सुविधा आहेत, अशा महाविद्यालयांमध्ये पूर्ण क्षमतेने वर्ग सुरु करता येतात.
तथापि, केवळ ज्या जिल्ह्यांमध्ये कोविड पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यांना ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याची परवानगी आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर २ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथे वर्ग ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले जातील.
विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गात उपस्थित राहण्यासाठी पालकांकडून संमतीपत्र सादर करणे बंधनकारक आहे आणि पालकांनी त्यांच्या प्रभागांमध्ये कोविड सारखी लक्षणे नसल्याचे प्रमाणित केले पाहिजे.