बेंगळूर/प्रतिनिधी
सर्व जिल्हा रूग्णालयात कोरोनानंतरही कोरोना देखभाल आणि पुनर्वसन केंद्रे असतील, असे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ.के.सुधाकर यांनी म्हंटले आहे.
गुरुवारी मंत्रिमंडळाच्या तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य आणि विधानसौधतील तज्ज्ञांसह उच्चस्तरीय बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुधाकर यांनी संक्रमित व्यक्ती बरे झाल्यानंतरही त्यांची काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हंटले. व्हिक्टोरिया आणि केसी सामान्य रुग्णालयांमध्ये पुनर्वसन केंद्रे असतील. तसेच सर्व जिल्हा रूग्णालयातही पुनर्वसन केंद्रे असतील आणि आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि कमिटीने अहवाल दिल्यानंतर कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येतील, असे ते म्हणाले.
तज्ञांच्या माहितीनुसार पुनर्प्राप्तीनंतर ५ टक्के लोक कोरोना विषाणूच्या संपर्कात येऊ शकतात. ज्यांना पूर्वी गंभीर संसर्ग होता त्यांच्यात संसर्गाची तीव्रता कमी असेल. त्याचप्रमाणे ज्यांना पहिल्यांदा लक्षणे नव्हती त्यांना दुसऱ्यांदा जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे बरे झालेल्या रूग्णांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेच पाहिजे, असे सुधाकर यांनी म्हंटले आहे.
दरम्यान कोरोना मृत्यूविषयी सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा अभ्यास केला जात आहे. लवकरच या संदर्भात अहवाल सादर केला जाईल, असे ते म्हणाले.









