बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळात खातेवाटपावरून काही मंत्री नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राजीनाम्यची धमकी देखील दिलेली असताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये कोणतेही मदभेद नाहीत. खातेवाटपावरून आता कोणीही नाराज नाही. त्यामुळे सरकार आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल, असे माजी केंद्रीय मंत्री, खासदार डी. व्ही. सदानंद गौडा यांनी म्हण्टले आहे.
दरम्यान, बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सिद्धरामय्या यांच्या टीकेला उत्तर दिले. सिद्धरामय्या यांनी बोम्मई सरकार अधिक दिवस राहणार नाही असे म्हटले होते. खासदार गौडा म्हणाले की, काँग्रेस पक्ष चक्रीवादळात अडकलेल्या बोटीसारखा आहे. परिणामी सिद्धरामय्या यांचे डोके फिरले आहे, असे ते म्हणाले.
गौडा यांनी, सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी झाल्याने एच. डी. कुमारस्वामींना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागले. ज्यांचा काँग्रेस आणि जद (एस) ने भ्रमनिरास केला आहे त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, दक्षिण भारतात भाजप अधिक मजबूत होईल.
कायदेशीर कारवाई सुरू करा
अभिनेत्री संजना गलराणी आणि रागिणी द्विवेदी यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याविषयी उत्तर देताना सदानंद गौडा म्हणाले की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली पाहिजे. “हे इतरांसाठी चेतावणीचे संकेत असतील. अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुळापासून अंत झाला पाहिजे. आफ्रिकन नागरिक कथितपणे ड्रग्सचा पुरवठा करत आहेत. त्यांच्यावरही गंभीर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, ”ते पुढे म्हणाले.