बेंगळूर/प्रतिनिधी
कॉंग्रेसचे सरचिटणीस दिनेश गुंडूराव यांनी पूर परिस्थितीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. सरकारला पुरग्रस्तांची कसलीच काळजी नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना गुंडूराव यांनी गेल्या वर्षीही केंद्र सरकारकडून अनुदान घेऊन पूर परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले होते. यावेळीही सरकार अपयशी ठरले असून त्यांना केंद्राकडून मदत मिळू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्नाटकातील जनतेची चिंता नाही. पंतप्रधानांना कर्नाटकात नव्हे तर फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येच पूर दिसतो.
राज्यातून २५ खासदार संसदेत पाठविण्यात आले आहेत. परंतु नागरिकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी ते लपून बसले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना या खासदारांना लाज वाटली पाहिजे. कर्नाटकातील अनेक जिल्हे पुरामुळे त्रस्त आहेत. महसूलमंत्री आर. अशोक यांनी केवळ दोन जिल्ह्यांचा दौरा केला आहे. कर्नाटकात पूरपरिस्थिती गंभीर असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. सरकार निष्काळजी असून त्यांना जनतेशी काही देणं घेणं नसल्यासारखं वागत आहे, अशी टीकाही कॉंग्रेस सरचिटणीस दिनेश यांनी केली आहे.









