बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने ग्रामीण भागात वाढणारा कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी आणि कोरोना सकारात्मकता दर व मृत्यूचे प्रमाण कमी करण्याची तातडीची गरज लक्षात घेऊन शुक्रवारी राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये ३२,२१८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ५२,५८१ जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच कोरोना संक्रमणामुळे ३५३ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे शुक्रवारी ५२,५८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
राज्यात १० मेपासून सुरू असलेला हा लॉकडाऊन २४ मे रोजी संपणार होता. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंत्र्यांशी चर्चा करून लॉकडाऊन ७ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. आंतर-प्रवासी वाहतुकीवरील निर्बंधासह सध्याच्या नियमांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.









