बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना साथीच्या आजारामुळे अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. कोरोनामुळे हरवलेल्या शैक्षणिक दिवसांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी करण्याचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग विचार करीत आहे. दरम्यान शिक्षकांच्या संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
कोरोना च्या राज्य तांत्रिक समितीने शिक्षण विभागाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी करण्याचा सल्ला दिला होता आणि राज्यभरात याची अंमलबजावणी करण्याचा विभाग विचार करीत आहे. डिसेंबरअखेर होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमवेत या विषयावर चर्चा होईल, अशी अधिकृत माहिती आहे.
राज्य प्राथमिक शालेय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. नारायण स्वामी यांनी सहसा मुलांना विश्रांतीसाठी सुट्ट्या दिल्या जातात. परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेता आम्ही सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचे समर्थन करू. दरम्यान, काही शिक्षकांनी असे मत व्यक्त केले आहे की उन्हाळ्याची सुट्टी कमी करण्याऐवजी शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या तीव्र तणावातून मुक्त करण्यासाठी कमीतकमी १५ ते २० दिवसांची ‘सुट्टी’ देण्याचा सरकारने विचार केला पाहिजे.