बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा हे एक आव्हान उभे राहिले आहे. बेंगळूरसह, मंगळूर, म्हैसूर, बळ्ळारी, बेळगाव तसेच चित्रदुर्ग आणि हवेरी आदी जिल्ह्यातील छोट्या शहरांमध्ये ऑक्सिजनचा अभाव दिसून येत आहे.
वाणिज्य व उद्योग विभागाचे प्रधान सचिव गौरव गुप्ता यांनी गेल्या एका महिन्यात ऑक्सिजनची मागणी पाच पटीने वाढली असल्याचे म्हंटले होते. ६० मेट्रिक टनाऐवजी, दररोज ३०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ऑक्सिजनचा अविरत पुरवठा वेळेवर करावा, अशा सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.
सरकारी रुग्णालये चांगली स्थितीत आहेत, परंतु खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असोसिएशनच्या (पीएचएएनए) माहितीनुसार कंपन्यांनी ऑक्सिजनच्या किंमतीत ३०-५५ टक्क्यांनी वाढ केली आहे. अपील करूनही, राज्य सरकार उपचार शुल्कासारखे ऑक्सिजनचा सर्वोच्च दर निश्चित करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.