बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने २१ सप्टेंबरपासून विधान सौधच्या सभागृहात विधानसभेचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना साथीच्या प्रसाराची गांभीर्याने दखल घेत सर्व खबरदारीच्या उपाययोजना यावेळी राबविण्यात येणार आहेत. विधानसभेचे हे अधिवेशन 10 दिवस घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. यावेळी सदस्यांसाठी मास्क, सामाजिक अंतर, विधानसभेच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर्सची उपलब्धता असणार आहे. सर्व सावधगिरीच्या उपाययोजनांसह हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. कायदा आणि संसदीय कार्यमंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी सोमवारी ही माहिती दिली.
सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी, कायदा आणि संसदीय कार्यमंत्री जे. सी. मधुस्वामी आणि मुख्य सचिव टी. एम. विजय भास्कर यांनी सोमवारी विधानसभा हॉलची पाहणी केली.
आधीचे विधिमंडळ अधिवेशन मार्चमध्ये कोरोनामुळे सरकारने देशव्यापी लॉकडाउन लावण्यापूर्वी संपविले होते.









