ऑपरेशन कमळ’मुळे भाजप सत्तेवर
15 वी विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी 12 मे 2018 रोजी निवडणूक झाली. बेंगळूरच्या जयनगर येथील भाजपचे आमदार विजयकुमार यांच्या निधनामुळे आणि राजराजेश्वरीनगर येथे मतदारांच्या फसवणुकीचे प्रकरण उघड झाल्याने निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. या दोन्ही मतदारसंघात 28 मे 2018 रोजी मतदान घेण्यात आले. 2013 च्या निवडणुकीत दाखविलेला करिष्मा काँग्रेसला 2018 मध्ये दाखविला आला नाही. काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. तर भाजपने पुन्हा मुसंडी मारत 104 जागा मिळविल्या. निजदला 37 आणि इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या. मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने सत्ता स्थापनेला दावा करत येडियुराप्पांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, बहुमत सिद्ध करता न आल्याने येडियुराप्पा पायउतार झाले व निजद-काँग्रेस युतीने सरकार स्थापन केले. वर्षभराच्या सत्तानाट्यानंतर पोटनिवडणूक जिंकून भाजपने सत्ता हस्तगत केली.
2018 मध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निजदने काँग्रेसशी युती केली. युतीमध्ये आलबेल नसल्याचा फायदा उठवत सरकार पाडण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबविले आणि युतीमधील 15 आमदारांनी राजीनामे दिले. परिणामी युतीचे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे एक वर्ष दोन महिन्यात कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. येडियुराप्पा मुख्यमंत्री बनले. दोन वर्षात त्यांना भाजपने पदावरून हटविले आणि बसवराज बोम्माईंना मुख्यमंत्री बनविले. या विधानसभेनेही तीन मुख्यमंत्री पाहिले.
काँग्रेसला मते तर भाजपला जागा जास्त
मतांची टक्केवारी पाहता भाजपला 36.35 टक्के तर काँग्रेसला 38.14 टक्के मते मिळाली होती. मतांच्या बाबतील काँग्रेस जरी वरचढ ठरला तरी भाजपला जास्त जागा मिळाल्या होत्या. अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता. निजदला 18.3 टक्के, स्वतंत्र आणि इतर पक्षांना पक्षातील उमेदवारांना 6.1 टक्के मते मिळाली होती. महत्त्वाचे म्हणजे 0.9 टक्के मतदारांनी नकारात्मक मतदान केले होते. 1952च्या निवडणुकीनंतर 2018 मध्ये कर्नाटकात विक्रमी 72.13 टक्के मतदान नोंदविले गेले.
बेळगाव जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय निकाल
मतदारसंघ पक्ष विजयी उमेदवार
निपाणी भाजप शशिकला जोल्ले
चिकोडी-सदलगा काँग्रेस गणेश हुक्केरी
अथणी काँग्रेस महेश कुमटहळ्ळी
कागवाड काँग्रेस श्रीमंत पाटील
कुडची भाजप पी. राजीव
रायबाग भाजप दुर्योधन ऐहोळे
हुक्केरी भाजप उमेश कत्ती
अरभावी भाजप भालचंद्र जारकीहोळी
गोकाक काँग्रेस रमेश जारकीहोळी
यमकनमर्डी काँग्रेस सतीश जारकीहोळी
बेळगाव उत्तर भाजप अनिल बेनके
बेळगाव दक्षिण भाजप अभय पाटील
बेळगाव ग्रामीण काँग्रेस लक्ष्मी हेब्बाळकर
खानापूर काँग्रेस अंजली निंबाळकर
कित्तूर भाजप महांतेश दौ•गौडर
बैलहोंगल काँग्रेस महांतेश कौजलगी
सौंदत्ती-यल्लम्मा भाजप विश्वनाथ (आनंद) मामनी
रामदुर्ग भाजप महादेवप्पा यादवाड
युतीतील 15 आमदारांचे राजीनामे अन् पोटनिवडणूक
‘ऑपरेशन कमळ’चा परिणाम म्हणून काँग्रेस आणि निजदमधील 15 आमदारांना फोडण्यात भाजपला यश आले. या आमदारांनी राजीनामे दिले. या सर्व आमदारांना भाजपने मुंबईतील हॉटेलमध्ये नेले. त्यातील एकही आमदार पुन्हा माघारी जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. या सर्व 15 आमदारांचे नेतृत्व रमेश जारकीहोळी यांनी केले होते. नंतर तत्कालिन विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सर्व आमदारांना निलंबित केले. नंतर न्यायालयीन लढ्यात या सर्व आमदारांनी बाजी मारली. या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. पोटनिवडणुकीत नंतर 5 डिसेंबर 2019 या दिवशी 15 मतदारसंघांमध्ये म्हणजेच गोकाक, अथणी, कागवाड, यल्लापूर, हिरेकेरुर, राणेबेन्नूर, विजयनगर, चिक्कबळ्ळापूर, के. आर. पूर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआऊट, शिवाजीनगर, होसकोटे, कृष्णराजपेठ या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपला बुहमतासाठी किमान 6 जागा जिंकणे आवश्यक होते. 15 पैकी 12 जागा भाजपला मिळाल्या. तर दोन जागा काँग्रेसला आणि एक जागा भाजपमधील बंडखोर उमेदवाराने जिंकली होती. शिवाजीनगर येथे रोशन बेग यांनी राजीनामा दिला होता. मात्र, भाजपने त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले नाही. त्यामुळे बेग यांनी पोटनिवडणूक लढविली नाही. येथील जागा काँग्रेसने राखली. होसकोटेमध्ये एम. टी. बी. नागराज यांना भाजप बंडखोर उमेदवाराचे आव्हान पेलता आले नाही. त्यामुळे बंडखोर उमेदवार विजयी झाला. तर हुणसूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार मंजुनाथ यांनी विजय मिळविला होता.
शेट्टरांच्या पराभवासाठी रा.स्व.संघाची फौज

नागपुरातील 50 कार्यकर्ते हुबळीत आल्याची माहिती
माजी मुख्यमंत्री, अलीकडेच काँग्रेसप्रवेश केलेल्या हुबळी-धारवाड सेंट्रलचे उमेदवार जगदीश शेट्टर यांचा पराभव करण्यासाठी आणि आपली मतबँक सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) मदत घेण्याचा पुढाकार घेतला आहे. संघ कार्यकर्त्यांना तैनात करून भाजपने अनेक डावपेच आखले आहेत. नागपुरातील सुमारे 50 आरएसएस कार्यकर्त्यांना हुबळी येथे बोलावून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लिंगायत समाजातील नेत्यांना पक्षापासून दूर ठेवण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला विरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

नुकताच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी धारवाड जिल्ह्याचा दौरा केला असून दोन लोकप्रिय लिंगायत मठांना भेट देऊन समाजाला आकर्षित करण्याची रणनीती अवलंबली आहे. याशिवाय मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार महेश टेंगिनकाई यांचा विजय निश्चित करण्यासाठी पक्ष अनेक योजना आखत आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी हुबळी येथे जाऊन पक्षाच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेतली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक घेतली आहे.
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने शेट्टर यांनी पक्षाचे सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आरएसएसनेही हुबळी-धारवाड सेंट्रल मतदारसंघातील लढत सन्मानाने घेतली आहे. आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी शेट्टर यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यास सुऊवात केली आहे. याचबरोबर शेट्टरांच्या घराकडे जाऊन येणाऱ्यांवरही लक्ष ठेवले आहे. हुबळीतील शेट्टर यांच्या हालचालीवर गुप्तपणे लक्ष ठेवून असलेल्या आरएसएस कार्यकर्त्यांच्या गटाने यावेळी शेट्टरांचा पराभव करून भाजप उमेदवाराला विजयी करण्याची शपथ घेतली आहे.
उपतहसीलदार निवडणूक रिंगणात
हावेरीत भाजपकडून तिकीट, गरिबांचा अधिकारी म्हणून गवीसिद्धाप्पा यांची ओळख
प्रांताधिकारी कार्यालयात प्रथम श्रेणी साहाय्यक, उपतहसीलदार म्हणून काम करताना ग्रामीण लोकांना मदत करणारा, गरिबांचा अधिकारी अशी ओळख केलेल्या गवीसिद्धाप्पा द्यामन्नावर यांना हावेरी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे.
विशेष म्हणजे भाजपची उमेदवारी जाहीर होईपर्यंत ते बॅडगीचे उपतहसीलदार म्हणून काम करत होते. द्यामन्नावर यांचे लोकांसाठी असलेले काम पाहून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना लोकांना त्रास होऊ नये, अशापद्धतीने काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
शेती, घर यासंबंधी तहसील कार्यालायला जाऊन कागदपत्रांचे काम करणे, मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारचे दाखले काढून आणणे, ही कामे सहजासहजी होत नसल्याचा सर्वश्रुत अनुभव आहे. ग्रामीण लोकांना कागदपत्रे कुठे द्यायची, कुठली कागदपत्रे कुठे मिळतात, याचे सामान्य ज्ञान नसलेल्या लोकांसाठी मदत करणारा अधिकारी म्हणून द्यामन्नावर यांची ओळख आहे.
आपल्या कार्यालयात आलेल्यांना थेट मदत करत असत. तालुका कार्यालयात आलेल्या अनेकांची यांना थेट ओळख झाल्याचा फायदा त्यांना होणार
आहे.
द्यामन्नावर हे मुळचे गदग जिह्यातील लिंगदाळ गावचे असून कृषी पदवीधर आहेत. 2013 मध्ये पीएचडी करताना हावेरीत प्रांताधिकारी कार्यालयात प्रथम श्रेणी साहाय्यक म्हणून नोकरीत रुजू झाले. उपतहसीलदार म्हणून हावेरी व गुत्तलमध्ये काम केले. गेल्या दोन वर्षांपासून बॅडगी येथे ग्रेड-2 तहसीलदार म्हणून ते सेवेत होते. अजूनही 10 वर्षे सरकारी सेवा शिल्लक असताना राजीनामा देऊन ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
लिंगायत पॅक्टर केंद्रबिंदू

काँग्रेस-भाजप परस्परांना घेरण्याच्या तयारीत : लिंगायत मुख्यमंत्री जाहीर करा; भाजपचे काँग्रेस नेत्यांना आव्हान2018 प्रमाणे 2023 ची विधानसभा निवडणूकही लिंगायत समाजाभोवती फिरण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. गेल्या काही निवडणुकीत हाच पॅक्टर अधिक चालला असून त्यामुळेच दोनवेळा या मुद्यावर निवडणूक लढली आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झाला. तेच कार्ड आता काँग्रेस आक्रमकपणे खेळत असून भाजप त्याला शह देण्यासाठी व्य?हरचना करत आहे.
भाजपला लिंगायतविरोधी शिक्का मारण्याचे काम काँग्रेसने सुरू केले आहे. काँग्रेसच्या या रणनितीला आव्हान देण्यासाठी भाजप नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकांना राज्यातील लिंगायत नेत्यांची उपस्थिती होती. लवकर लिंगायत नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यास मदत होईल, असा भाजप नेत्यांचा सूर आहे. तर काँग्रेसलाही लिंगायत नेत्याचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावे, असे आव्हान दिले जात आहे. कारण काँग्रेसमध्ये तीन समुदायाचे नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने त्यांनाही घेरण्याचे तंत्र भाजपने वापरण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
भाजपच्या नेत्यांनी याबाबत बैठक घेऊन केंद्रीय नेते धर्मेंद्र प्रधान यांच्या कानावर या गोष्टी घातल्या आहेत. पण, पक्षश्रेष्ठी यावर काहीही निर्णय देण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. भाजपमधील काही दिग्गज नेते पक्ष सोडून काँग्रेस व इतर पक्षांत गेले आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचाही समावेश आहे. या लिंगायत नेत्यांना बाहेर पडावे लागल्याचे भांडवल ते नेते व काँग्रेसही करत असल्याने भाजपला लिंगायतविरोधी हा ठपका ठेवला जात आहे. राज्यात सर्वाधिक मते लिंगायत समाजाची असून त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असा भाजपातील लिंगायत नेत्यांचा दावा आहे.
येडियुराप्पा यांच्या घरामध्ये लिंगायत नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 30 लिंगायत नेते सहभागी झाले होते. या बैठकीत काँग्रेसच्या खेळीला उत्तर देण्यासाठी चर्चा करण्यात आली. सध्या पक्षाबद्दल गैरसमज पसरविला जात आहे. त्याला पूरक म्हणून काही नेते पक्ष सोडलेले आहेत. त्यासाठी तात्काळ याला प्रतिबंध करण्यासाठी लिंगायत समाजातील नेत्याला आता मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज असल्याचे सूचविण्यात आले. धर्मेंद्र प्रधान यांच्याशी लिंगायत नेत्यांबरोबर चर्चा झाली आहे. या बैठकीला बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचीही उपस्थिती होती. एम. पी. रेणुकाचार्य यांनी याबाबत लिंगायत मुख्यमंत्री चेहरा पुढे करण्याची गरज बैठकीत बोलून दाखविली आहे. या बैठकीनंतर खुद्द मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपने या लिंगायत मतपेटीच्या राजकारणाचा चांगला धसका घेतला आहे, हे स्पष्ट होते.
मंत्री सोमण्णा यांनी काँग्रेसवर उलटवार करताना म्हटले आहे की, काँग्रेसने आधी लिंगायत समाजाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा. मग, इतर पक्ष लिंगायतविरोधी आहे की नाही, यावर बोलावे, असा टोला लगावाला तर येडियुराप्पा यांचा मुलगा विजयेंद्र यांनीही ट्वीट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने भाजपला लिंगायतविरोधी ठपका ठेवत आहे. काँग्रेसने गेल्या 50 वर्षांत किती लिंगायत नेत्यांना मुख्यमंत्री केले आहे, याचे उत्तर द्यावे. वीरेंद्र पाटील यांना केवळ 9 महिन्यात राजीनामा द्यावा लागला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.
भाजपला दोनवेळा राज्यात सत्ता मिळालेली आहे. त्या दोन्ही वेळेला मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या लिंगायत ला?बीला मोठे यश मिळालेले आहे. वीरशैव समाजाच्या आरक्षणावरून काँग्रेसला घेरून त्यावेळी लिंगायतविरोधी काँग्रेस असे वातावरण करूनच भाजपने यापूर्वी काँग्रेसला रोखले होते. त्याचप्रकारचे राजकारण आता काँग्रेसने भाजपविरोधात करण्यास सुरू केले आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत राज्यपातळीवर लिंगायत समाजाचेच कार्ड प्रचाराचा खरा तंत्र बनल्याचे स्पष्ट आहे.









