सभापतींच्या अविश्वास ठरावावरून प्रचंड गदारोळ : काँगेस सदस्यांकडून उपसभापतींना धक्काबुक्की
प्रतिनिधी/ बेंगळूर
सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याच्या मुद्दय़ावरून मंगळवारी विधानपरिषदेत अक्षरशः हंगामा झाला. सदस्यांची धक्काबुक्की, हाणामारी, अपशब्द वापरून अपमान यासारख्या अनुचित प्रकारांमुळे सभागृहात गोंधळ माजला. सकाळी 11.15 वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच सभापतींच्या आसनावर उपसभापती एस. एल. धर्मेगौडा आसनस्थ झाले. याचवेळी भाजप सदस्यांनी सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांनी सभागृहात प्रवेश करू नये यासाठी दरवाजा बंद करून तेथेच ठाण मांडले. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी धर्मेगौडा यांना आसनावरून बळजबरीने ओढून धक्काबुक्की करून तेथून हटविले. यावेळी भाजप, निजद आणि काँग्रेस सदस्यांमध्ये हातघाई झाली. या लाजीरवाण्या प्रकारामुळे सभागृहाच्या शिस्तीला तडा गेला. अखेर सभागृहाचे कामकाज पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले. काँग्रेस सदस्यांच्या वर्तणुकीविरोधात भाजप आणि निजद शिष्टमंडळाने राज्यपालांकडे तक्रार दाखल केली असून प्रतापचंद्र शेट्टी यांना सभापतीपदावरून पदच्युत करण्यासाठी कायदेशीर लढा देण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्यात निजद-काँग्रेस युतीचे सरकार असताना विधानपरिषदेचे सभापती म्हणून काँग्रेसचे सदस्य प्रतापचंद्र शेट्टी तर उपसभापतीपदी निजद सदस्य धर्मेगौडा यांची निवड करण्यात आली होती. आता निजदने सत्ताधारी भाजपला पाठिंबा देऊन प्रतापचंद्र शेट्टी यांना पदच्युत करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिताच सरकारने मंगळवारी विधानपरिषदेचे विशेष अधिवेशन घेतले. सभापतांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याच्या इराद्यानेच भाजपचे सदस्य आणि निजदने सभापतींना सभागृहात प्रवेश नाकारण्यासाठी दरवाजा लावून रोखून धरले. तसेच उपसभापती धर्मेगौडा यांच्या नेतृत्वाखालीच सभागृहाचे कामकाज घेण्याची तयारी केली. त्यामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे सदस्य श्रीनिवास माने, नासीर अहमद, प्रकाश राठोड, नारायणस्वामी, रवी यांनी सभापतींच्या आसनाकडे धाव घेत धर्मेगौडा यांच्या रक्षणार्थ उभे असणाऱया भाजप सदस्यांना ढकलून दिले. तसेच धर्मेगौडा यांनाही खुर्चीवरून ओढून बाहेर काढले.
यावेळी निजदचे सदस्य बसवराज होरट्टी यांच्यासह अनेकजण धर्मेगौडांच्या रक्षणासाठी धावले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. त्याच वेळी सभापतींच्या आसनाभोवती थांबलेले भाजप आणि काँग्रेस सदस्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करून हटविण्याचा प्रयत्न केला. या गदारोळादरम्यान सभापतींना रोखून धरण्यासाठी भाजपने दरवाजा लावून पहारा ठेवला. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य नासीर अहमद यांनी दरवाजाला लाथ मारल्याचा प्रसंगही घडला. यावेळी नासीर अहमद आणि रवीकुमार यांच्यात मारामारी झाली. सभापतींच्या आसनाभोवती थांबलेल्या सदस्यांनी प्रतिपक्षाच्या सदस्यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की सुरूच ठेवली. त्यामुळे काही जण खाली कोसळले. सभागृहातील गोंधळावर कोणी नियंत्रण आणावे हा मोठा पेच निर्माण झाला.
अशा परिस्थितीत देखील उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी धर्मेगौडा यांना सोबत घेऊन काँग्रेस सदस्यांना ढकलून सभापतींच्या आसनाजवळ नेले. मात्र, काँग्रेस सदस्यांनी धर्मेगौडांना तेथे बसू दिले नाही. त्यांना पुन्हा खाली ढकलून दिले व चंद्रशेखर पाटील यांना सभापतींच्या स्थानावर बसवून त्यांच्याभोवती उभे राहून सुरक्षा कवच निर्माण केले. यावेळी काँग्रेसचे सदस्य नारायणस्वामी यांनी सभापतींच्या आसनासमोर असणारी काच काढून फेकून दिली. तर काही जणांनी माईक उपटून फेकून दिला. तर काहींनी तेथील कागदपत्रे फाडून टाकली. सभागृहाला आलेले रणांगणाचे स्वरुप पाहून काही जणांची भितीने गाळण उडाली. महिला सदस्यांची तर बोबडी वळाली.
सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये संघर्ष सुरू असतानाच कसेबसे मार्शलांच्या सुरक्षेत सभापती प्रतापचंद्र शेट्टी सभागृहात आले. मात्र, आसनावर न बसता त्यांनी उभे राहून सभागृहाचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब केले आणि क्षणार्धात तेथून बाहेर पडले. त्यानंतर देखील सभागृहात एकमेकांविरोधात हातघाई सुरूच होती. एकमेकांविरोधात धिक्काराच्या घोषणेमुळे सभागृहातील शिस्तीचे तीन तेरा वाजले.
भाजप-निजद शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे तक्रार
विधानपरिषदेत कामकाजाच्या सुरुवातीलाच घडलेल्या घडामोडींबाबत भाजप आणि निजद सदस्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. सभापतींनी बहुमत गमावलेले आहे. त्यामुळे त्यांना पदच्युत करण्यासाठी हस्तक्षेप करून आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली.
सभागृहात सभापतींच्या आसनावर बसलेले काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर पाटील यांच्याविरोधातही राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली आहे. काँगेस सदस्यांच्या बेशिस्तीबद्दलही तक्रार करण्यात आली असून कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गृहमंत्री बसवराज बोम्माई, महसूलमंत्री आर. अशोक, कायदा-संसदीय कामकाजमंत्री जे. सी. माधुस्वामी, रमेश गौडा, बसवराज होरट्टी, पुट्टण्णा व इतर नेते याप्रसंगी उपस्थित होते.
राज्यपालांनी मागविला अहवाल
विधानपरिषदेत मंगळवारी घडलेल्या घडामोडींसंदर्भात राज्यपाल वजुभाई वाला यांनी अहवाल मागविला आहे. राज्यपालांनी राज्य सरकारच्या संसदीय सचिवालयाला यासंबंधी सूचना केली आहे. मंगळवारी सभागृहात घडलेली घटना संसदीय व्यवस्थेला मारक असून त्यासंबंधी माहिती सादर करण्यात यावी, अशी सूचना राज्यपालांनी दिल्याचे समजते.