बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्यांना लसीकरणाचा पहिला डोस दिल्यावर उच्च शिक्षण विभाग ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याच्या तारखांची घोषणा करणार आहे.
उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी माध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व कर्मचार्यांना लसीकरण मिळावे यासाठी महाविद्यालयीन स्तरावर लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. “सर्व पात्र विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्यांना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाल्यानंतर लवकरच ऑफलाइन वर्गांची तारीख जाहीर केली जाईल,” असे ते म्हणाले.
विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना राबविल्या जाणाऱ्या मोहिमेदरम्यान लसीकरण घेण्यासाठी संबंधित संस्थेने प्रदान केलेले पत्र सादर करावे लागेल आणि प्रत्येक महाविद्यालयाचे प्रमुख व विभागातील एक अधिकारी या ड्राइव्हसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमले जाणार आहेत. या नोडल अधिकाऱ्यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्यांना लस मिळावी याची खबरदारी घ्यावी.
विभाग व विद्यार्थी व कर्मचार्यांसाठी घेतलेल्या लसीकरण मोहिमेसाठी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली जारी केली जाणार आहे. “लसीकरणानंतरही विद्यार्थ्यांना ऑफलाइन वर्गात प्रवेश करण्यास अस्वस्थ वाटत असल्यास ते ऑनलाइन वर्गात प्रवेश घेऊ शकतात. दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येतील, परंतु ऑनलाइन वर्गातही विद्यार्थ्यांसाठी उपस्थिती अनिवार्य आहे,” असे उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण म्हणाले.









