बेंगळूर/प्रतिनिधी
देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरु आहे. दरम्यान कर्नाटकात कोरोना लस घेतलेल्या पाच डॉक्टरांना एका आठवड्याच्या कालावधीत कोरोनाच्या विषाणूची लागण झाली आहे. त्यामळे कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कोरोना लस कोरोनाविरुद्ध प्रभावी आहे की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान यात एक कोरोना नोडल अधिकारी देखील संक्रमित झाला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) एम. सी. रवी यांनी याविषयी माहिती दिली आणि डॉक्टरांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. चार डॉक्टर घरी उपचार घेत असून एक जिल्हा जण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आणि डॉक्टरांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दरम्यान दुसरा डोस चार आठवड्यांनंतर दिला जाईल.
जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले की कोरोनाव्हायरस या विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास वेळ लागते त्यामुळे लसीकरण झालेल्या लोकांना घाबरून जाण्याची गरज नाही.