बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक भाजप मधील अंतर्गत वादाची नेहमीच चर्चा होत आली आहे. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर टीका केली होती. येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री असणारे बसवराज बोम्माई यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. पण थोड्याच दिवसात पुन्हा बसवराज बोम्माईंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची चर्चा सुरु झाली होती.त्यामुळे भाजप मधील वाद आणि पक्षावर होणारी टीका नेहमीच चर्चेचा विषय बनत आली आहे. आता पुन्हा एकदा भाजपाचे नेते आणि कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अन्वर मनिप्पाडी यांनी बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातील मुस्लिम समाजाशी गैरवर्तन करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मनिप्पाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सब का साथ सब का विकास’ या कार्यक्रमाचे कर्नाटकात पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यात मुस्लिम समाजाशी गैरवर्तन केले जात आहे, त्यांना त्रास दिला जात आहे आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असे मनिप्पाडी यांनी म्हटले आहे.
मनिप्पाडी यांनी लिहलेल्या त्यांच्या पत्रात म्हंटले आहे की, न्यायालयाच्या आदेशानंतरही मुस्लिमांना दफनभूमी मिळू शकली नाही आणि महामारीच्या काळात त्यांना दफनभूमीच्या शोधात २५-३५ किमीपर्यंत प्रवास करावा लागला.