बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. दरम्यान कर्नाटकात सलग कोरोना रुग्णवाढीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. पण पुन्हा बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. दरम्यान गुरुवारीही सलग दुसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यात कोरोनाने गुरुवारी ५०० चा टप्पा ओलांडला.
दरम्यान राज्यात गुरुवारी ५७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ४४६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ४ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६,१२८ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणारे सर्वाधिक रुग्णही बेंगळूरमध्येच आहेत. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात ३८५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर ३१० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ४,३५८ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









