आर्थिक व्यवहार, उद्योग उद्यापासून सुरूः रेड झोनमध्ये प्रवासी सेवेला सूट नाही : निर्बंधित क्षेत्रातील नियम कडकच
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढविण्यात आल्यानंतर राज्य सरकारने नवी मार्गसूची जारी केली आहेत. कोरोनामुक्त असलेल्या ग्रीन झोनमधील जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन सर्व प्रकारे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यास सूट देण्यात आली आहे. तर रेड झोन आणि ऑरेंज झोनमध्ये निवडक क्षेत्रांना सूट देण्यात आली आहे. मात्र येथील कंटेन्मेंट प्रदेशात (निर्बंधित क्षेत्र) मात्र कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. येथील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविली जाणार आहे.
केंद्र सरकारने घोषित केलेल्या मार्गसूचीप्रमाणे राज्य सरकारने राज्यातील आर्थिक व्यवहार आणि उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याबाबतची नवी मार्गसूची शनिवारी घोषित केली. ग्रीन झोन व ऑरेंज झोनमध्ये टॅक्सी, कॅब सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या ठिकाणी खासगी प्रवासी सेवा सुरू करण्यास काही अटी घालण्यात आल्या आहेत. तर परिवहनची बससेवा फक्त ग्रीन झोनमध्य सुरू होणार असून त्यामध्ये 30 पेक्षा अधिक प्रवासी असू नयेत, अशी अट घालण्यात आली आहे. बसमध्ये मास्क, सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे. तर रेड झोनमध्ये बस, ऑटोरिक्षासह कोणत्याही प्रवासी वाहनांना परवानगी देण्यात आलेली नाही. येथे मुक्तपणे वाहन संचार करण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, पोलीस, मालवाहतूक होणारी वाहने तसेच पास विशेष पास असणाऱया वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
रेड झोनमध्येही ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तू पुरवठा करू शकतात. औद्योगिक वसाहती, खासगी कंपन्याही सुरू करण्यास मुभा देण्यात आली असून 33 टक्के कर्मचारी येथे काम करू शकतात. स्थानिक कर्मचाऱयांना कंपन्यांमध्ये कामासाठी बोलावून घेणे उचित ठरेल, अशी अट घालण्यात आली आहे. वाणिज्य आणि खासगी संस्थाही सुरू होणार आहे. आयटी-बीटी कंपन्या, कॉल सेंटर, बाजारपेठेतील दुकानेही सुरू होणार आहेत. कच्चा माल पुरवठाही सुरू करता येणार आहे. कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतरासह आरोग्य सुरक्षेचे पालन करणे बंधनकारक आहे. तथापि, मॉल, व्यापारी संकुलातील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. येथील सलून, ब्यूटी पार्लरही बंद राहणार आहेत.
प्रवासासाठी आंतरजिल्हा पास देणार
राज्यातील ग्रीन झोन 4 मे पासून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपापल्या जिल्हय़ात परतणाऱया कामगारांना केएसआरटीसीकडून वन वे तिकीट दर आकारून पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरील जिल्हय़ातून येणाऱयांना सांस्थिक क्वारंटाईन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लॉकडाऊन काळात वेगवेगळय़ा गावांमध्ये अडकून पडलेल्यांना आपल्या गावी येण्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणी परतण्यासाठी एका दिवशी एका वेळेस आंतरजिल्हा पास देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. काही बसेसमध्ये आपापल्या गावी परतणाऱया कामगारांकडून जादा पैसे वसूल होत असल्याची माहिती मिळाल्याने मुख्यमंत्र्यांनी दुप्पट पैसे वसूल करू नयेत, असा आदेश दिला आहे.
मद्यप्रेमींनाखूषखबर; पण….
कंटेन्मेंट झोन (निर्बंधित प्रदेश) वगळता सर्वत्र सोमवारपासून मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात देखील मद्यप्रेमींना खूषखबर मिळाली असली तरी बार ऍन्ड रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. एमएसआयएल, वाईन शॉप व इतर मद्यदुकानांनमध्ये केवळ पार्सल स्वरूपात मद्यविक्री होणार आहे. सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत मद्यदुकाने खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दोन ग्राहकांमध्ये 6 फुटांचे अंतर, दुकानात 5 पेक्षा कमी जणांना प्रवेश, सर्वांनी मास्क वापरणे सक्तीचे आहे, असा अधिकृत आदेश अबकारी खात्याने दिला आहे. कंटेन्मेंट प्रदेशाच्या आगमन-निर्गमनाच्या ठिकाणी मद्याची ने-आण करता येणार नाही. या ठिकाणी कसून तपासणी केली जाणार आहे.
कोणत्याही झोनमध्ये या सुविधा राहणार नाहीत
विमान, रेल्वे, मेट्रो रेल्वे
आंतरराज्य प्रवासी सेवा
सर्व शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था
मॉल, चित्रपटगृहे, उद्याने
मंदिरे, प्रार्थना स्थळे, जत्रा
व्यायाम शाळा, जलतरण तलाव
राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक सभा-समारंभ
रात्री 7 ते सकाळी संचार करण्यास निर्बंध
65 वर्षांवरील, 10 वर्षाखालील मुले, गर्भवतींनी बाहेर पडू नये
ऑरेंज-ग्रीन झोनमध्ये या क्षेत्रांना सूट
सलून, ब्यूटी पार्लर, स्पा
मेडिकल, क्लिनिक, ओपीडी (बाहय़ रुग्णसेवा)
ई-कॉमर्स, बँक
मर्यादित कामगारांसह …
कुरियर आणि पोस्ट
मालवाहतूक
कॅब, टॅक्सी, ऑटोरिक्षा
रेड झोनमध्ये या सुविधा बंद राहणार
सलून, ब्यूटी पार्लर, स्पा
खासगी व सरकारी प्रवासी सेवा
आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक
पास नसणारी वाहने









