निपाणी/प्रतिनिधी
राज्यात गेल्याकाही दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आज निपाणी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. तालुक्यात उद्भवलेल्या पूरस्थितीची ते पाहणी करत आहेत.
दरम्यान निपाणी तालुक्यातील यमगरणी येथील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग येथे आलेल्या महापुराची पाहणी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी रविवारी केली. दुपारी बारा वाजता मुखयमंत्री या ठिकाणी दाखल झाले. यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, महसूल मंत्री आर. अशोक, आमदार महांतेश कवठगीमठ मुख्यमंत्र्यांसोबत होते.
वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ त्याचप्रमाणे शेतीपिकासह घरांचे झालेले नुकसान या विषयी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पाहणी करून माहिती घेतली. त्याच प्रमाणे यमगरणी निवारा केंद्राला भेट देऊन तेथे देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पूरग्रस्तांना अधिकाधिक निधी मिळवून देऊ असे आश्वासन दिले.