बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेवर बोलताना राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी रविवारी सांगितले की, पक्षात मुख्यमंत्री बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांनी नेतृत्वात बदल होण्याच्या विषयावर पक्षात कोणत्याही स्तरावर चर्चा झालेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. “कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा असावेत म्हणून आमचा एकमताने निर्णय होता. ते अवाढव्य अनुभव असलेले आमचे नेते आहेत, ”अशी प्रतिक्रिया त्यांनी मंगळूरमधील पत्रकारांना दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही जोपर्यंत भाजप हाय कमांडचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी मुख्यमंत्री असणार, असे म्हंटले आहे.
प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांनी, पक्षात बंडखोरी नाही. “आम्ही असंतुष्ट मंत्री आणि आमदारांशी बोललो आहे. सर्व असंतोष, मतभेद सोडवले गेले आहेत. या महिन्यात आमदार आणि मंत्र्यांमधील मतभेदांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल, ” असे त्यांनी म्हंटले आहे.









