कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा शनिवारी ठप्प, दोन्ही राज्यांच्या परिवहनला फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
कन्नड संघटनांनी गुरुवारी शिवसेना कार्यालयाजवळ धुडगूस घालून वाहनांना काळे फासले. मराठी फलकांना काळे फासल्याने त्याचे पडसाद शहरात उमटले. शुक्रवारी कोल्हापूर बसस्थानकात शिवसैनिकांनी कर्नाटक परिवहनच्या बसेसना काळे फासल्याने खबरदारी म्हणून शनिवारी दोन्ही राज्यांची आंतरराज्य बससेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांना मोठा फटका बसला.
बेळगाव बसस्थानकातून शनिवारी कर्नाटक परिवहनच्या बसेस निपाणीपर्यंतच धावल्या. त्यामुळे महाराष्ट्रात जाणाऱया प्रवाशांची गैरसोय झाली. बेळगाव, संकेश्वर, निपाणी, गोकाक, चिकोडी, अथणी या आगारातून महाराष्ट्रात धावणाऱया बसेसची संख्या साधारण 350 ते 400 पर्यंत आहे. कर्नाटकच्या बेळगावसह इतर आगारातून महाराष्ट्रात धावणाऱया बसेसच्या माध्यमातून 40 टक्के उत्पन्न मिळत असते. मात्र शनिवारी बससेवेवर परिणाम झाल्याने बेळगाव बसस्थानकातून दररोज धावणाऱया 142 हून अधिक गाडय़ा केवळ निपाणीपर्यंतच धावल्या. तर काही बसेस बसस्थानकातच जाग्यावर उभ्या होत्या. त्यामुळे बेळगाव विभागाला एक दिवसासाठी 4 ते 5 लाखांचा फटका बसला आहे.
बेळगाव जिल्हय़ाला महाराष्ट्र राज्य लागून असल्याने उद्योग व्यवसाय व इतर कारणासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कर्नाटक परिवहनचा महसूल हा महाराष्ट्रात धावणाऱया बसगाडय़ांवर अवलंबून असतो. मात्र शनिवारी महाराष्ट्रात धावणाऱया बसेस ठप्प झाल्याने महसूलावर परिणाम झाला. आधीच कोरोनामुळे परिवहनला मोठा फटका बसला आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहन धडपड करत आहे. विविध ठिकाणी बसफेऱया वाढवून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र शुक्रवारी शहरात वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धूडगूस घातल्याने बससेवा ठप्प झाली होती. याचा फटका परिवहनला बसला. कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा बंद राहिल्याने दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या जनतेला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
बेळगाव बसस्थानकातून दररोज महाराष्ट्रातील कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, मिरज, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, औरंगाबाद बार्शी आदी ठिकाणी बसेस धावतात. त्यामुळे या माध्यमातून कर्नाटक परिवहनला चांगला महसूल मिळतो. मात्र बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रात धावणाऱया बसेस शनिवारी ठप्प झाल्याने परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला. शनिवारी कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प झाली असली तरी रविवारी सुरळीत सुरू होईल, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
बेळगाव विभागाला फटका- के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)
बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रात धावणाऱया बसेसच्या माध्यमातून चांगला महसूल मिळतो. मात्र शनिवारी ही आंतरराज्य बससेवा बंद राहिल्याने महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. दररोज बसस्थानकातून महाराष्ट्रात 142 हून अधिक बसेस धावतात. त्यामुळे उत्पन्न चांगले मिळते. मात्र कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेवर परिणाम झाल्याने बेळगाव विभागाला फटका बसला.









