बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक राज्याने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. देम्यान केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक सरकारने राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. मार्चच्या सुरूवातीपासूनच कर्नाटकात कोविड -१९ नवीन घटनांमध्ये वाढ झाली असून, राज्य सरकारने सोमवारी शेजारच्या महाराष्ट्र आणि केरळमधून राज्यात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी नकारात्मक आरटी-पीसीआर अहवालाची तपासणी करण्याचे ठरविले.
बेंगळूरमधील मंत्री आणि उच्च अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी, “आम्ही महाराष्ट्र आणि केरळ सीमेवर आरटी-पीसीआर नकारात्मक चाचणी अहवालासाठी तपासणी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व उपायुक्तांना मंगळवारपासून याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली असल्याचे स्पष्ट केले.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटकमध्ये मार्चच्या सुरूवातीपासूनच ९,०२१ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी ५,८०२ प्रकरणे केवळ एकट्या राजधानी शहरातील आहेत. गेल्या पंधरवड्यात बेंगळूरमध्ये एकूण ५९ मृत्यूंपैकी ४० मृत्यू झाले.
दरम्यान, बीबीएमपी कमिशनर एन मंजुनाथा प्रसाद म्हणाले की कोविड -१९ प्रकरणांची रोजची सरासरी वाढ मार्चमध्ये ४०० वर पोचली आहे, त्या तुलनेत फेब्रुवारी आणि जानेवारीत ते २४३ आणि ३०० होती.