प्रवाशांची गैरसोय : खासगी वाहनांचा आधार : बेळगाव विभागाला तब्बल 18 लाखांचा फटका
प्रतिनिधी / बेळगाव
कन्नड संघटनांनी गुरुवारी शिवसेना कार्यालयाजवळ धुडगूस घालून वाहनांना काळे फासल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक परिवहनच्या बसना काळे फासले. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प आहे. परिणामी हजारो प्रवाशांची गैरसोय झाली असून प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. कर्नाटक-महाराष्ट्र वाद पुन्हा एकदा चिघळल्याने याचा फटका दोन्ही राज्यांच्या परिवहनना बसला आहे.
बेळगावातून महाराष्ट्रात धावणाऱया दैनंदिन बसगाडय़ा जागेवर थांबून असल्याने महसूल बुडत आहे. आधीच कोरोनामुळे परिवहनचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत परिवहन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील असतानाच पुन्हा महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा ठप्प झाल्याने परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
बेळगाव-कोल्हापूर दैनंदिन प्रवास करणाऱया नोकरदार, व्यावसायिक, कामगारांमुळे बेळगाव विभागाला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून बेळगाव विभागाला साधारण 40 टक्के महसूल मिळतो. मात्र, महाराष्ट्रात धावणाऱया बसेस सध्या केवळ निपाणीपर्यंत धावत आहेत.
बेळगाव विभागातून दररोज महाराष्ट्रात बसच्या 142 हून अधिक फेऱया होतात. या बसच्या माध्यमातून बेळगाव विभागाला दररोज 5 ते 6 लाखांचा महसूल मिळतो. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात धावणाऱया बसगाडय़ा ठप्प झाल्याने बेळगाव विभागाला तब्बल 18 लाखांचा फटका बसला आहे. बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रातील कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, मिरज, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, औरंगाबाद, बार्शी आदी शहरांकडे बसेस धावतात. त्यामुळे दैनंदिन बस वाहतुकीतून कर्नाटक परिवहनला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य वाहतूक ठप्प असल्याने बेळगाव विभागाचे उत्पन्न घसरले आहे. बेळगाव विभागासह चिकोडी विभागातील संकेश्वर, निपाणी, हुक्केरी, अथणी व गोकाक विभागांनाही फटका बसला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, सीमा हद्दीवरील नागरिकांना व प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे बससेवा तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांतून होत आहे.
बेळगाव आगारातून आज बसेस धावणार
बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रात धावणाऱया बसची संख्या अधिक आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून बससेवा ठप्प आहे. यात परिवहन आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. कोल्हापूर बस महामंडळ विभागातील प्रमुखांशी चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडून लवकर बस सुरू करण्याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नाही. मात्र, मंगळवारपासून बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रात बस पाठविल्या जाणार आहेत, असे बेळगावचे विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी यांनी सांगितले.









