बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची संधी मिळाली . दरम्यान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेऊन राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये राज्यातील विकासकामे, पूर परिस्थिती, राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि अन्य विषयांवर त्यांनी चर्चा केली असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी मान्यता मिळवण्याऐवजी त्यांनी भेटीचा उपयोग राज्यातील जनतेच्या हितासाठी करावा आणि केंद्र सरकारकडून अधिक निधी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असे म्हंटले आहे.
गेल्या वर्षी राज्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असले तरी त्यांनी केवळ १८६९ कोटी रुपये देऊन केंद्र सरकारने अन्याय केला असल्याचे ते म्हणाले. यावर्षी पावसामुळे ८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या थकबाकीदारांना अधिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर दबाव आणला पाहिजे, असे सिद्धरामय्या यांनी म्हंटले आहे.
तसेच सिद्धरामय्या यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे कर्नाटकचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे म्हंटले आहे. कर संकलनात कर्नाटक राज्य आघाडीवर असूनही कर्नाटकला विकास कामांसाठी केंद्राकडून फारसे अनुदान मिळत नाही. जीएसटीच्या थकबाकीच्या बदल्यात राज्य सरकारवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी दबाव आणत आहे. राज्य सरकारला दिवाळखोरीत टाकण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.