बेंगळूर / प्रतिनिधी
देशामध्ये कोरोनाचे थैमान सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा धोका ओळखून सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा आधार घेत विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरु आहे. शिक्षकही विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करत आहेत. यातच कर्नाटक सरकारने राज्य महाविद्यालयीन शाळांचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने शैक्षणिक वर्षात सुधारित व ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम सोमवारी कर्नाटक टेक्स्ट बुक सोसायटीच्या (केटीबीएस) वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे.
वर्ग १ ते १० वी साठी 140-120 कार्य दिवसांमध्ये अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे.
केटीबीएसचे व्यवस्थापकीय संचालक माडेगौडा यांनी , सुधारित अभ्यासक्रम सार्वजनिक शिक्षण विभाग व शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आला आहे व त्याला मान्यता मिळाली आहे. नियमित शालेय वर्षात 210-220 कार्य दिवस असतात. सोमवारी हा सुधारित अभ्यासक्रम केटीबीएस वेबसाइटवर अपलोड करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.