बेंगळूर/प्रतिनिधी
गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहाद विधेयक विधिमंडळात मांडण्याचे आवाहन भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत शनिवारी करण्यात आले. ग्राम स्वराज्य कार्यक्रम घेण्याचे तसेच आगामी निवडणुकांमध्ये ८० टक्के ग्रामपंचायतींवर विजय मिळविण्याचे प्रयत्न करण्याचेही ठरविण्यात आले.
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, भाजप पक्षाचे राज्यातील पक्षाचे प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, सह प्रभारी डी. के. अरुण, भाजप प्रदेश अध्यक्ष नलिनकुमार कटील, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी या बैठकीत निवडणूक समिती आणि शिस्त समिती नेमण्यात आली. बेळगाव लोकसभा मतदारसंघ आणि मस्की व बसव कल्याण विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अद्याप जाहीर झालेल्या उमेदवारांसाठी निवडणूक समिती निर्णय घेईल.
प्रदेशाध्यक्ष हे शिस्त समितीचे स्वतः अध्यक्ष असतील, अशी माहिती कटील यांनी पत्रकारांना दिली.
मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर मुद्द्यांवरून जाहीरपणे आणि माध्यमांसमोर वक्तव्य करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना अशा प्रकारच्या कृत्यांपासून परावृत्त करण्यास सांगितले गेले.
आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांना खात्री दिली आहे की त्यांच्या तक्रारी पक्षाच्या मंचांवर ऐकल्या जातील. शिस्तीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाईल, असे कटील म्हणाले.









