ऑनलाईन टीम / कोल्हापूर
दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. यामुळे कर्नाटक सरकार खडबडून जागे झाले असुन आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य सिमेवर वाहनांची कसुन चौकशी सुरु आहे. राज्यात प्रवेश करतेवेळी आरटीपीसीआर निगेटीव्ह टेस्ट अथवा कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोसचे प्रमाणपत्रक बंधनकारक करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य शासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असुन अनेक प्रवासी रस्त्यातच अडकले आहेत.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ”ओमिक्रोन”चा प्रादुर्भाव दिवसें – दिवस जगभरात वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना लस घेतलेल्यांच्या प्रतिकारशक्तीवर सुद्धा हा व्हेरिएंट मात करत असल्याचं समोर आले आहे. यामुळे जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. यातच बेंगलोर येथे आफ्रीकेतून आलेल्या दोन प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने कर्नाटक राज्यप्रशासन ही सतर्क झाले आहे.








