बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना लवकरच आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांसारखे ओळखपत्र मिळणार आहे.
गुरुवारी एका परिपत्र काढत कर्नाटकचे पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक (डीजी व आयजीपी) प्रवीण सूद यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी ओळखपत्र देण्याचे निर्देश दिले.
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त पोलीस ओळखपत्राचा वापर सरकारी कार्यालयांमध्ये किंवा त्यांच्या प्रवासादरम्यान करतील. तसेच त्यांना ओळखपत्रामुळे पोलीस कॅन्टीनमध्ये प्रवेश मिळू शकेल.
दरम्यान आयजीपी, एसपी कार्यालये, सीआयडी, अंतर्गत सुरक्षा विभाग, प्रशिक्षण, रेल्वे, स्टेट इंटेलिजन्स आणि इतर विशेष युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी ओळखपत्र दिले जाणे आवश्यक आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.