बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे ३८ वे मुख्य सचिव म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी पी. रवी कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते ३१ डिसेंबर २०२० रोजी पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव म्हणून टी. एम. विजय भास्कर काम करत होते. आता त्यांच्या जागी पी. रवी कुमार काम पाहणार आहेत.
१९८४ बॅचचे आयएएस अधिकारी रवी कुमार हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव (एसीएस) आहेत आणि पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे एसीएस होते.
विजय भास्कर यांच्या नंतर कर्नाटक संवर्गातील दुसरे सर्वात वरिष्ठ आयएएस अधिकारी रवी कुमार आहेत. कार्मिक व प्रशासकीय सुधार विभागाने (डीपीआर) बुधवारी अधिकृत अधिसूचनेत कुमार यांना मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले असून आज ते पदभार स्वीकारणार आहेत.